लोणारात भटक्या श्वानांच्या धुमाकूळ, पालिकेचे दुर्लक्ष

लोणार
शहरातील विविध भागांत भटक्या श्वानांची संख्या वाढत असून, त्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रस्त्याने जाणाऱ्या पादचाऱ्यांच्या अंगावर धावून जाणे, दुचाकीस्वारांचा पाठलाग करणे आणि रात्रीच्या वेळी टोळक्याने रस्त्यांवर फिरणे, या प्रकारांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक मयुर रमेशचंद गोलेच्छा यांनी नगरपरिषद प्रशासनाकडे निवेदन देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
शहरातील अनेक वर्दळीच्या तसेच निवासी भागांमध्ये भटक्या श्वानांचे टोळके दिसून येत आहे. विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळेस नागरिकांना या श्वानांमुळे रस्त्यावरून ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अचानक अंगावर धावून येणाऱ्या श्वानांमुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
पाच जणांना चावा घेतल्याचा दावा
भटक्या श्वानांच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत पाच जणांना चावा घेतल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे ही समस्या केवळ नागरिकांना होणाऱ्या त्रासापुरती मर्यादित राहिलेली नसून, सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित गंभीर बाब बनली आहे. त्यामुळे प्रशासनाने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची वाट न पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
दुचाकीस्वारांनाही धोका
रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या मागे भटक्या श्वानांचे कळप धावत असल्याने दुचाकीस्वारांचा तोल जाण्याची अथवा अपघात होण्याची शक्यता निर्माण होत आहे. पादचाऱ्यांच्या अंगावर अचानक धावून जाण्याच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. या समस्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी नगरपरिषदेने विशेष मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नगरसेवक मयुर गोलेच्छा यांनी केली आहे. भटक्या श्वानांना पकडून त्यांची नियमानुसार नसबंदी करणे, आवश्यक पशुवैद्यकीय उपचार करणे आणि संबंधित प्रक्रियेनंतर योग्य ठिकाणी सोडणे, अशा उपाययोजना राबविण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही स्थानिक प्रशासनाची जबाबदारी असल्याने नगरपरिषदेने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. भटक्या श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी तातडीने कार्यवाही झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.




