बुलढाण्याच्या सौंदर्याला कचऱ्याचे गालबोट; भाईजी उद्विग्न

राधेश्याम चांडक यांनी व्यक्त केली चिंता; जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी

 

बुलढाणा,

 अजिंठ्याच्या डोंगररांगांच्या कुशीत वसलेले, निसर्गसंपदा आणि आल्हाददायक हवामानामुळे वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या बुलढाणा शहराच्या सौंदर्याला सध्या रस्त्यांवरील कचऱ्याचे गालबोट लागले आहे. शहराच्या प्रमुख प्रवेशमार्गांवर ठिकठिकाणी साचलेला कचरा, अस्वच्छता आणि त्यातून पसरणारी दुर्गंधी यामुळे नागरिकांसह शहरात येणाऱ्या पाहुण्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. या परिस्थितीबाबत बुलढाणा अर्बनचे संस्थापक राधेश्याम चांडक उपाख्य भाईजी यांनी तीव्र चिंता व्यक्त केली असून, या समस्येच्या तातडीच्या उपाययोजनांसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.

कधीकाळी स्वच्छ, सुंदर आणि टुमदार शहर म्हणून बुलढाण्याची ओळख होती. मात्र, शहराचा विस्तार झपाट्याने होत असताना स्वच्छता व्यवस्थेवर त्याच प्रमाणात लक्ष दिले जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. शहराला जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यांच्या कडेला तसेच प्रवेशद्वारांच्या परिसरात कचऱ्याचे ढीग साचल्याने शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण झाली आहे.

बुलढाणा शहरात वैद्यकीय, अभियांत्रिकी तसेच कृषी महाविद्यालयांमध्ये राज्यातील आणि देशाच्या विविध भागांतून सुमारे सहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांचे पालक, नातेवाईक तसेच विविध कारणांसाठी शहरात येणारे पाहुणे सर्वप्रथम शहराच्या प्रवेशद्वारांवर पोहोचतात. मात्र, प्रवेशद्वारांवरच कचरा, दुर्गंधी आणि अस्वच्छता दिसल्यास शहराबाबत बाहेरून येणाऱ्या नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जात असल्याची खंत चांडक यांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.

नगर परिषद तसेच शहरालगतच्या ग्रामपंचायती नागरिकांकडून मालमत्ता कर व इतर माध्यमातून महसूल गोळा करतात. मात्र, त्याच नागरिकांना स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरण उपलब्ध करून देण्याच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष होत असल्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला आहे. या समस्येबाबत यापूर्वीही पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र, अपेक्षित ठोस कार्यवाही झालेली नसल्याने आता जिल्हा प्रशासनाने या प्रश्नात पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाची अपेक्षा

जिल्हाधिकारी हे जिल्हा प्रशासनाचे प्रमुख असल्याने बुलढाणा शहराच्या स्वच्छतेच्या प्रश्नात त्यांनी थेट लक्ष घालावे, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवरील कचरा तातडीने उचलणे, नियमित स्वच्छतेचे नियोजन करणे आणि कचरा साचू नये यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे.

यासाठी जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून निधीची तरतूद करून शहराच्या प्रवेशमार्गांचे सुशोभीकरण व स्वच्छता अभियान राबवावे, अशी मागणीही राधेश्याम चांडक यांनी केली आहे.

निसर्गरम्य ओळख जपण्याची गरज

बुलढाण्याला लाभलेला निसर्गरम्य वारसा, शांत वातावरण आणि शहराची सुंदर ओळख हीच त्याची खरी संपत्ती आहे. त्यामुळे शहरात प्रवेश करतानाच नागरिक व पाहुण्यांना अस्वच्छतेचे चित्र दिसणे ही गंभीर बाब आहे. शहराच्या सौंदर्याला लागलेले हे कचऱ्याचे गालबोट दूर करून बुलढाण्याची स्वच्छ आणि सुंदर प्रतिमा पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी पावले उचलावीत, अशी आग्रही मागणी भाईजी यांनी केली आहे.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!