डासांच्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी लोणार नगरपरिषदेची धडक मोहीम

लोणार
पावसाळ्यात शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचत असल्याने डासांची उत्पत्ती वाढून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य रोगराईला आळा घालण्यासाठी लोणार नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने शहरभर जंतुनाशक व कीटकनाशक फवारणीची विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत शहरातील नाले, गटारे, साचलेले पाणी, मोकळ्या जागा तसेच पाण्याची डबकी असलेल्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने फवारणी केली जात आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या डासांच्या उत्पत्ती केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, आरोग्य विभागाचे कर्मचारी विविध भागांमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवत आहेत.
शहरातील काही मोकळ्या जागांमध्ये गवताची मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याने कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा ठिकाणीही कीटकनाशकांची फवारणी करून स्वच्छतेवर भर दिला जात आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याने नगरपरिषदेकडून नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे. नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांना घराभोवती व परिसरात पाणी साचू न देण्याचे, नियमित स्वच्छता राखण्याचे तसेच आरोग्य विभागाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. या मोहिमेमुळे शहरातील डासांचा प्रादुर्भाव कमी होऊन संभाव्य साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळविण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
फवारणी मोहिमेदरम्यान लोणार नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक भूषण मापारी, उपाध्यक्ष आबेद खान, गटनेते नितीन शिंदे, आरोग्य सभापती अब्दुल उबंदभाई, नगरसेवक गुलाब सरदार, अरुण जावळे, संतोष मापारी, शुभम देसाई, साहेबराव पवार, शाम राऊत तसेच काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते



