धामणगाव बढे परिसरातील रखडलेली रस्त्यांची कामे तातडीने सुरू करा; अन्यथा उपोषणाचा इशारा; सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन

धामणगाव बढे | सादिक बिस्मिल्लाह शेख

धामणगाव बढे व परिसरातील मंजूर झालेल्या आणि कार्यारंभ आदेश प्राप्त झालेल्या विविध रस्त्यांची कामे अद्याप प्रत्यक्षात सुरू झालेली नाहीत. त्यामुळे नागरिक, शेतकरी व वाहनधारकांमध्ये नाराजी वाढली असून, संबंधित रस्त्यांची कामे तातडीने सुरू न केल्यास उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना २२ सप्टेंबर रोजी निवेदन सादर करण्यात आले.

धामणगाव बढे परिसरातील अनेक रस्ते दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. मात्र, रस्त्यांची दुरवस्था झाल्याने शेतमालाची वाहतूक, विद्यार्थ्यांची ये-जा तसेच दैनंदिन प्रवासात नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात या समस्येत अधिक भर पडत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या रस्त्यांची कामे प्रलंबित

म्हाळुंगी–पिंपळगाव देवी रस्ता, धामणगाव बढे या रस्त्यासाठी २४ ऑगस्ट २०२६ रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. याशिवाय धामणगाव बढे–पान्हेरा, धामणगाव बढे–पेंचलींग, धामणगाव बढे–पाणीपुरवठा विहीर तसेच धामणगाव बढे–पिंपळगाव देवी या ६०० मीटर रस्त्यांसाठी सुमारे दोन वर्षांपूर्वीच कार्यारंभ आदेश देण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. मात्र, आदेश होऊनही कामे सुरू झालेली नसल्याने नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कार्यारंभ आदेशानंतरही कामे रखडण्यामागील कारणांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांकडून खुलासा घ्यावा, तसेच कामे सुरू करण्यासाठी आवश्यक त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. प्रत्येक कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याची गुणवत्ता आणि प्रगती यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, अशीही मागणी करण्यात आली आहे.  रस्त्यांच्या कामांना विलंब होत राहिल्यास नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा देण्यात आला असून, काम सुरू होण्याची तारीख आणि पूर्णत्वाची अपेक्षित मुदत नागरिकांना लेखी स्वरूपात कळवावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदन देतेवेळी शिवसेना शिंदे गटाचे मोताळा तालुका प्रमुख रामदास चोथानकर, माजी सरपंच भागवत दारखे, किसना भोरे, शिवसेना शहरप्रमुख मोहन सपकाळ, उपशाखाप्रमुख राजेश जाधव, अजिंक्य जाधव, सुनील दांडगे, राईस कुरेशी आदी उपस्थित होते.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!