वकिलसंघ आक्रमक ; नायब तहसीलदारांविरोधात व्यक्त केली तीव्र नाराजी

अधिकाऱ्यांच्या चौकशी, बदली व माफीनाम्याची वकिल संघाची मागणी

प्रतिनिधी | लोणार
महसूल प्रकरणात वकिलपत्र दाखल करण्यासाठी गेलेल्या ॲड. एस. ए. अवचार यांच्याशी नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर यांनी अपमानास्पद वर्तन केल्याचा आरोप लोणार तालुका वकिल संघाने केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध योग्य ती कार्यवाही करावी, तसेच वकिलाची लेखी व बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करत वकील संघाच्यावतीने तीव्र नाराजी व्यक्त करत उपविभागीय अधिकारी, लोणार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
वकिल संघाने दिलेल्या निवेदनानुसार, धर्मा गवई व इतर विरुद्ध ज्ञानेश्वर सिरसाट व इतर या रस्त्याच्या प्रकरणात ॲड. एस. ए. अवचार हे २९ सप्टेंबर रोजी संबंधित पक्षकारासह वकिलपत्र दाखल करण्यासाठी नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर यांच्यासमोर उपस्थित झाले होते. संबंधित पक्षकाराला २७ सप्टेंबर रोजी प्रकरणासंदर्भातील नोटीस मिळाल्यानंतर तो सुनावणीसाठी हजर झाला होता. यावेळी पक्षकाराला आपली बाजू मांडण्याची संधी देऊन वकिलामार्फत त्याचे प्रतिनिधित्व स्वीकारावे, अशी विनंती ॲड. अवचार यांनी केल्याचे संघाचे म्हणणे आहे. मात्र, संबंधित प्रकरण निकालासाठी बंद करण्यात आले असून वकिलपत्र स्वीकारले जाणार नसल्याचे सांगण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. याचवेळी ॲड. अवचार यांच्याशी कथितरित्या आक्षेपार्ह शब्दांत संवाद साधण्यात आला. “तुझ्याकडून काय होते ते करून घे” तसेच “तुझ्यासारखे लय वकील पाहिले” अशा शब्दांचा वापर करून अपमानास्पद वर्तन करण्यात आल्याचा आरोप वकिल संघाने निवेदनातून केला आहे.
हा प्रकार पक्षकार तसेच इतर व्यक्तींच्या उपस्थितीत झाल्याने ॲड. अवचार यांच्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचेही संघाने म्हटले आहे.

बार-बेंच समन्वयाचा मुद्दा ऐरणीवर
वकिल संघाने निवेदनात बार आणि बेंचमधील परस्पर सन्मान व समन्वयाचे महत्त्व अधोरेखित केले आहे. वकिलांना त्यांच्या पक्षकारांचे कायदेशीर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणे आवश्यक असून महसूल न्यायप्रक्रियेतही दोन्ही घटकांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे संघाने नमूद केले. कथित गैरवर्तनाच्या प्रकारामुळे वकिल आणि महसूल प्रशासनातील संबंधांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

चौकशीसह बदलीची मागणी
या प्रकरणाची सखोल चौकशी करून ॲड. एस. ए. अवचार यांना झालेल्या कथित अपमानाबाबत लेखी व बिनशर्त माफीनामा द्यावा, अशी मागणी वकिल संघाने केली आहे. तसेच नायब तहसीलदार योगेश्वरी परळीकर यांची बदली करून त्यांच्या अखत्यारितील प्रकरणे अन्य सक्षम अधिकाऱ्याकडे वर्ग करावीत, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी, लोणार यांना निवेदन देताना लोणार तालुका वकिल संघाचे अध्यक्ष ॲड. रणजीत डव्हळे यांच्यासह ॲड. सुधाकर अवचार, ॲड. विठ्ठल तनपुरे, ॲड. शिवाजी सानप, ॲड. सदाशिव मुंढे, ॲड. दीपक मापारी, ॲड. शिवम पालवे, ॲड. आशिष तिनगुरिया, ॲड. विष्णू वाघ, ॲड. निशांत वायाळ, ॲड. ओम भालेराव, ॲड. भूषण सानप, ॲड. गजानन आवारे, ॲड. संतोष भाकडे, ॲड. लहाने, ॲड. अवसरमोल, ॲड. फौजिया अली आदी वकील उपस्थित होते.
000

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!