MPSCच्या कारभारावर सत्ताधारी आमदाराचाच सवाल; चौकशीची मागणी

बुलडाणा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षा प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात स्पर्धा परीक्षार्थींचे आंदोलन सुरू असतानाच आता सत्ताधारी पक्षातील आमदार संजय गायकवाड यांनी आयोगाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ अध्यक्षांच्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार नसून, MPSCच्या संपूर्ण मंडळाच्या कामकाजाची चौकशी करून मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भातील पत्र आणि आपल्याकडे उपलब्ध असल्याचे सांगितलेले पुरावे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर करणार असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
MPSCच्या परीक्षांमध्ये पारदर्शकता नसल्याचा आरोप करत पुण्यासह राज्यातील विविध भागांतील विद्यार्थी आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या मागण्या मांडत आहेत. परीक्षा प्रक्रिया, पेपर तपासणी तसेच भरतीच्या पद्धतीबाबत विद्यार्थ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली आहे. आता सत्ताधारी आमदारानेच आयोगाच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत MPSCच्या कामकाजातील कथित अनियमिततेचा मुद्दा उपस्थित केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, परीक्षा प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत संशय व्यक्त केला जात असून, त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामुळे केवळ एखाद्या पदाधिकाऱ्याचा राजीनामा घेऊन प्रकरण संपवण्याऐवजी संपूर्ण मंडळाच्या कार्यपद्धतीची तपासणी करावी, अशी त्यांची भूमिका आहे.
MPSCच्या कामकाजाबाबत २०१८ पासून प्रश्न उपस्थित होत असल्याचा दावाही त्यांनी केला. आयोगाशी संबंधित काही व्यक्तींच्या आर्थिक व्यवहारांची आणि मालमत्तेतील कथित वाढीची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
‘मालमत्तेचीही तपासणी व्हावी’
आयोगाशी संबंधित व्यक्तींच्या संपत्तीत झालेल्या वाढीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी गायकवाड यांनी केली. छत्रपती संभाजीनगरशी संबंधित काही व्यक्तींची नावे आणि माहिती आपल्याकडे असल्याचे त्यांनी सांगितले. संबंधित व्यक्तींच्या मालमत्तेत झालेली वाढ त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत कशी झाली, याची तपासणी करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी देवानंद शिंदे, शैलेंद्र देवळाणकर, सतीश देशपांडे आणि अभय वाघ या व्यक्तींच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केल्याचे सांगितले. या व्यक्तींविषयी त्यांनी केलेले आरोप हे त्यांच्या दाव्यांच्या स्वरूपातील असून, त्यांची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे चौकशीअंतीच या आरोपांमागील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.




