भाजपच्या जिल्हाध्यक्षाने केली ११ नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्षाकडे तक्रार
परभणीत भाजपचा अंतर्गतवाद चव्हाटयावर

प्रतिनिधी | परभणी
परभणी जिल्ह्यात भाजपमधील अंतर्गत कलह उफाळून आला असून, जिल्हाध्यक्षांनीच ११ नगरसेवकांविरोधात थेट प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. या घडामोडीमुळे पक्षात एकच खळबळ उडाली आहे.
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी स्वीकृत नगरसेवक निवडीला विरोध दर्शवत गटनेता बदलण्याची मागणी केली होती. त्यामुळे जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी पक्षशिस्तीचे कारण समोर करत या सर्व नगरसेवकांची प्रदेशाध्यक्षाकडे तक्रार केली असल्याने एकच खळबळ उडाली आहे. परभणी मध्ये मागील काही दिवसापासून प्रशिक्षण, महत्वाच्या बैठका, कार्यक्रम या मध्ये नगरसेवक डॉ.केदार खटींग, रितेश झांबड, मीना सुरेश, गिरीजा शंकर, गणेश नंदकुमार टाक, विश्वजीत बुधवंत आदी हे सातत्याने गैरहजर राहतात. या सोबत काही पदाधिकारी देखील आहे. या सर्वावर तत्काळ पक्ष शिस्तभंगाची कारवाई करत निलंबित करण्यात यावे अशी मागणी भरोसे यांनी केली आहे.
भरोसे यांच्या या तक्रारीमुळे परभणी मध्ये अंतर्गत वाद चव्हाटयावर आला असून या प्रकरणाची मोठया प्रमाणात चर्चा होत आहे.




