अजित पवार गटातील वादावर ब्रेक; सुनेत्रा पवार ठरल्या ‘क्रायसिस मॅनेजर’

राजीनाम्याच्या टोकावर गेलेले ९० पदाधिकारी माघारी?; “एक संधी गेली म्हणून काय?” संदेशाने वातावरण मवाळ

बुलढाणा : विधान परिषद उमेदवारीवरून उसळलेला राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मधील नाराजीचा उद्रेक आता निवळण्याची चिन्हे दिसत आहेत. अल्पसंख्यांक सेलचे राज्य पदाधिकारी ॲड. नाझेर काझी यांना तिकीट न मिळाल्याने जवळपास ९० पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याची भूमिका घेतली होती. मात्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्या सुनेत्रा पवार यांच्या थेट हस्तक्षेपानंतर या वादावर पडदा पडण्याची चिन्हे आहेत.

१ मे रोजी सुनेत्रा पवार यांनी काझी यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा करत, “एक संधी मिळाली नाही म्हणून काय? पुढेही संधी मिळू शकते,” असा संदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. या संवादानंतर कार्यकर्त्यांचा संताप काहीसा कमी झाला असून, राजीनाम्याची भूमिका माघारी घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दोन दिवसांपूर्वी याच मुद्द्यावरून बुलढाण्यात राजकीय वातावरण तापले होते. पदाधिकाऱ्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकत पालकमंत्री मकरंद पाटील यांना घेराव घातला, घोषणाबाजी केली आणि राजीनामे देण्याचा इशारा दिला होता. मात्र आता पक्षांतर्गत चर्चांमुळे तोडग्याचा मार्ग मोकळा होत असल्याचे संकेत आहेत.

दरम्यान, या चर्चेदरम्यान आमदार मनोज कायंदे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. वरिष्ठ स्तरावरून समन्वय वाढवून नाराजी निवळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले जाते.

विधान परिषदेसाठी इच्छुक असलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नाराजीचीही चर्चा रंगली होती. मात्र त्यांनी ती फेटाळून लावत, “मी इच्छुक होतो, पण पक्षाचा निर्णय मान्य आहे. तिकीट दुसऱ्याला मिळाल्यानंतर मी माझे प्रयत्न थांबवले,” असे स्पष्ट केले.

काझींना तिकीट नाकारल्याने उसळली हेती खदखद

गेल्या काही वर्षांपासून विधान परिषदेसाठी नाव चर्चेत असलेल्या ॲड. नाझेर काझी यांना पुन्हा एकदा संधी न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा ज्वालामुखी फुटला. ही केवळ एका नेत्याची नाराजी नसून, दीर्घ प्रतीक्षेनंतरही संधी हुकल्याची भावना पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र होती. त्यामुळेच थेट सामूहिक राजीनाम्याचा पर्याय निवडत पक्षावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला.

सुनेत्रा पवारांचा हस्तक्षेप ठरला टर्निंग पॉइंट

परिस्थिती टोकाला जात असतानाच सुनेत्रा पवार यांनी थेट संवाद साधत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. “एक संधी गेली म्हणून काय?” हा त्यांचा संदेश कार्यकर्त्यांसाठी दिलासा देणारा ठरला. या संवादामुळे भावनिक प्रतिक्रिया ओसरत गेल्या आणि राजीनाम्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची भूमिका पुढे आली.

 सानंदा यांचा संयमी पवित्रा

तिकीटाच्या शर्यतीत असलेल्या दिलीपकुमार सानंदा यांच्या नाराजीची चर्चा रंगली होती; मात्र त्यांनी शांत आणि संयमी भूमिका घेत पक्षाचा निर्णय मान्य केला. “मी इच्छुक होतो, पण तिकीट न मिळाल्यानंतर प्रयत्न थांबवले,” असे सांगत त्यांनी अंतर्गत संघर्षाला हवा न देता संघटनेशी निष्ठा राखण्याचा संदेश दिला.

बुलढाण्यातील हा ‘राजकीय भूकंप’ दोन दिवसांत टोकाला गेला; पण वरिष्ठांच्या एका हस्तक्षेपानेच परिस्थिती नियंत्रणात येण्याची चिन्हे दिसत आहेत. आता हा वाद पूर्णतः निवळतो की पुन्हा पेट घेतो, यावर पुढील राजकीय समीकरणे अवलंबून असतील.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!