आमदार संजय गायकवाड यांची आमदार की रद करण्याची मागणी
आमदार संजय गायकवाडांवर शाहू महाराज संतापले

कोल्हापूर | प्रतिनिधी
राज्यात आग पसरावी तसा हा विषय सर्वत्र पसरला आहे. आता आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावर खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोल्हापूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी गायकवाड यांच्या वक्तव्याची टीका केली आणि अशा प्रकारची भाषा जनतेला मान्य होणार नसल्याचे स्पष्ट केले.
शाहू महाराज छत्रपती म्हणाले की, सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी बोलताना जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे. कोणाबद्दल काय बोलायचं याचं भान नसणं ही गंभीर बाब आहे. गायकवाड यांनी केलेले वक्तव्य अजिबात योग्य नसून, त्यावर सरकारने तातडीने कारवाई करावी, असे त्यांनी नमूद केले. आमदारकी रद्द करण्याबाबतचे नियम मला ठाऊक नसले तरी, त्त्यांचे निलंबन करुन त्यांच्या वर्तनावर कठोर पावले उचललीच पाहिजेत, असेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणात पुढे बोलताना शाहू महाराजांनी सरकारवरही अप्रत्यक्ष टीका केली. काही गोष्टींवर त्वरित निर्णय होत नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सूचित केले. त्यामुळे या प्रकरणात सरकारने योग्य ती कारवाई लवकर करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गायकवाड यांच्या वक्तव्याचा निर्णय आता जनता देईल, असेही त्यांनी ठामपणे म्हटले.




