५ ते २८ फेब्रुवारीदरम्यान शेगावात राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार उद्घाटन; आयुष उपचारांचा महासंगम

प्रतिनिधी | शेगाव
संत गजानन महाराजांच्या पावन नगरी शेगाव येथे येत्या २५ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत ‘राष्ट्रीय आयुष आरोग्य मेळावा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने होणाऱ्या या चार दिवसीय राष्ट्रीय स्तरावरील आरोग्य महोत्सवाचे उद्घाटन भारताच्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. ही माहिती केंद्रीय आयुष मंत्री व आयुष (आरोग्य व कुटुंब कल्याण) राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ही पत्रकार परिषद नुकतेच पार पडली. यावेळी कामगारमंत्री आकाश फुंडकर, बुलडाणा जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, कार्यकारी अधिकारी अवधेश कुमार श्रीवास्तव आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान पुढे बोलतांना केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की, देशभरात आयुष पद्धतींना नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. आयुर्वेद, युनानी, सिद्धा, सोवा-रिग्पा, होमिओपॅथी, निसर्गोपचार व योग या सर्व पारंपरिक उपचार पद्धती एकाच छताखाली आणण्याचा हा ऐतिहासिक प्रयत्न आहे. जनसामान्यांना परवडणाऱ्या व प्रभावी आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे, हाच या मेळाव्याचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याच्या आयोजनाची जबाबदारी अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन या देशातील सर्वात जुनी व प्रतिष्ठित आयुर्वेदिक संघटना यांच्याकडे देण्यात आली आहे. १९०७ साली महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर येथे स्थापन झालेली ही संस्था गेल्या शतकभरापासून आयुर्वेदाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य करीत आहे. या मेळाव्यासाठी स्वतंत्र आयोजन समिती गठित करण्यात आली असून, आयुर्वेद महासंमेलनाचे उपाध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता यांच्याकडे आयोजन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यपाल, मुख्यमंत्री सह अनेक मान्यवर होणार सहभागी
शेगावात आयोजित मेळाव्याला महाराष्ट्राचे महामहीम राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, बुलडाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील, सहपालकमंत्री संजय सावकारे, कामगारमंत्री आकाश फुंडकर, आमदार डॉ. संजय कुटे, तसेच आयुर्वेद क्षेत्रातील ज्येष्ठ तज्ज्ञ पद्मश्री व पद्मविभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलनाचे अध्यक्ष वैद्य प्रा. राकेश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

चार दिवस होणार मोफत तपासणी
या चार दिवशीय संमेलनात नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. ही तपासणी आयुष उपचार पद्धतीनुसार औषधोपचार, तसेच नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांकडून आरोग्यविषयक मार्गदर्शन व व्याख्याने आयोजित करण्यात येणार आहेत. यात वनऔषधी लागवड, औषधी वनस्पतींचे संवर्धन व त्यातून निर्माण होणाऱ्या आर्थिक संधींबाबत शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्यामुळे शेतीसोबत पूरक उत्पन्नाचे नवे मार्ग शेतकऱ्यांसाठी खुले होणार आहेत.

मेळाव्याच्या ठळक घडामोडी अशा राहतील
कालावधी : २५ ते २८ फेब्रुवारी २०२६
स्थळ : शेगाव, जिल्हा बुलडाणा
मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार
आयुर्वेद, होमिओपॅथी, योग, निसर्गोपचार आदी उपचार
तज्ज्ञ डॉक्टरांची व्याख्याने व मार्गदर्शन
वनऔषधी व आयुष उत्पादनांचे भव्य प्रदर्शन
शेतकऱ्यांसाठी विशेष आकर्षण
वनऔषधी लागवडीबाबत तांत्रिक मार्गदर्शन
औषधी वनस्पतींच्या व्यावसायिक संधी

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!