“लव्ह जिहादविरोधी कायदा समाजाच्या संरक्षणासाठी अत्यावश्यक” – आ. संजय गायकवाड
मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडलेल्या विधेयकाचे आ. गायकवाड यांनी केले स्वागत

प्रतिनिधी | बुलडाणा
राज्याच्या सभागृहात मांडण्यात आलेल्या लव्ह जिहादविरोधी विधेयकाचे स्वागत करत बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड यांनी हा कायदा समाजाच्या संरक्षणासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात मांडलेल्या लव्ह जिहादविरोधी विधेयकावर चर्चा होत असताना आमदार संजय गायकवाड यांनी ठाम समर्थन दर्शवले. हे विधेयक मुलींच्या सुरक्षिततेसाठी तसेच फसवणूक व जबरदस्ती धर्मांतराच्या घटनांवर आळा घालण्यासाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या ४० ते ४५ वर्षांपासून समाजकार्यात सक्रिय असल्याचे नमूद करत त्यांनी अशा अनेक घटनांचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्याचे सांगितले. खोट्या ओळखीच्या माध्यमातून मुलींना फसवून त्यांच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकण्याचे प्रकार समाजात घडत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करून १२० हून अधिक मुलींना सुरक्षितपणे त्या जाळ्यातून बाहेर काढल्याचा दावा त्यांनी केला. भाषणादरम्यान त्यांनी आपल्या मतदारसंघातील एका घटनेचा उल्लेख करत सांगितले की, एका तरुणाने नाव बदलून एका मुलीशी ओळख निर्माण केली आणि विश्वास संपादन करून तिच्यावर धर्मांतरासाठी दबाव टाकला. या प्रकरणात संबंधित मुलीला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागल्याचे त्यांनी सांगितले. लव्ह जिहादसारख्या घटनांचा परिणाम केवळ संबंधित मुलीवरच नव्हे, तर तिच्या संपूर्ण कुटुंबावर होतो, असे त्यांनी नमूद केले. अशा घटनांमुळे कुटुंबाला समाजात मानाने जगणे कठीण होते आणि इतर मुलींच्या भविष्यावरही परिणाम होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच हे विधेयक कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून समाजातील फसवणूक आणि जबरदस्ती रोखण्यासाठी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. खोट्या ओळखीच्या आधारे होणारे धर्मांतर आणि त्यामागील रॅकेट समाजासाठी घातक असल्याने त्यावर कठोर कारवाई होणे गरजेचे असल्याची मागणी त्यांनी केली.


