आमदार संजूभाऊ, खासदाराच्या एक पाउल पुढेच!
खासदारांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम ५ एप्रिल रोजी; तर आमदारांनी शेकडोंचा पक्षप्रवेश उरुकून घेतला

प्रतिनिधी | बुलडाणा
हर ताले की चाबी जेब में रखता हूं, म्हणणारे आमदार आमदार संजूभाऊ यांनी राजकिय आयपीएलच्या मैदारानावर मिळालेल्या फुलटॉस बॉलवर छक्का लगावला आहे. शिवसेनेची ताकत वाढवण्यासाठी केंद्रीयमंत्री तथा खासदार प्रतापराव जाधव यांनी चिखलीत पक्षाची ताकत वाढवण्यासाठी ५ एप्रिल रोजी पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते, परंतू २९ मार्च रोजीच आमदार संजय गायकवाड यांनी तब्बल २५ गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश करुन घेतला. हा कार्यक्रम त्यांच्या मातोश्री संपर्क कार्यालय येथे पार पडला. त्यामुळे सर्वत्र आमदार संजूभाऊ, खासदाराच्या एक पाउल पुढेच असल्याची चर्चा होत आहे.
जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून, येत्या ५ एप्रिल रोजी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर पक्षाला बळकटी देण्यासाठी पक्ष प्रवेश सोहळयाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाची रुपरेषा त्यांनी आज चिखली येथील राधाबाई खेडेकर विद्यालयात तालुक्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियोजन बैठक घेवून जाहिर केली. यावेळी व्यासपिठावर उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के शिवसेना तालुका प्रमुख गजानन मोरे शिवसेना शहर प्रमुख विलास घोलप माजी जिल्हा परिषद सदस्य शरद हाडे न पा उपाध्यक्षा वैशाली कपील खेडेकर शिवसेना शिक्षक सेनेचे वसंतराव गाडेकर उपस्थित होते. या पक्षप्रवेश कार्यक्रमाच्या नियोजनाची जोरदार तयारी सुरू असतानाच आमदार संजूभाऊ यांनी एक पाऊल पुढे टाकत चिखली तालुक्यातील २० ते २५ गावांतील अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश करुन घेत नियोजनाचे अप्रतिम उदाहरण दिले आहे. या अनपेक्षित हालचालीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. खासदारांच्या कार्यक्रमाला मोठी गर्दी जमवण्याचे नियोजन असतानाच आमदारांनी आधीच आपली ताकद दाखवत कार्यकर्त्यांना पक्षात सामील करून घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
आमदार संजूभाऊ यांच्या उपस्थितीत झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्यात विविध गावांतील कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. “विकासाच्या कामांवर विश्वास ठेवून आम्ही हा निर्णय घेतला,” असे नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
या वेळी नगरपालिका गटनेते मृत्युंजय संजय गायकवाड, धर्मवीर युथ फाऊंडेशन अध्यक्ष पृथ्वीराज संजय गायकवाड, शिवसेना जिल्हाप्रमुख ओमसिंग राजपूत, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख भास्करराव मोरे, किसानसेना जिल्हाप्रमुख संदीप गायकवाड, शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक जिजाताई राठोड, शिवसेना महिला आघाडी जिल्हा समन्वयक अनुजाताई सावळे, शिवसेना तालुकाप्रमुख धनंजय बारोटे, शिवदूत तालुकाप्रमुख नितीन राजपूत, उदयनगर सरपंच मनोज लाहुडकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दीपक तुपकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख निलेश गुजर, आदी उपस्थित होते.
शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही – आ. संजय गायकवाड
शिवसैनिक माझा परिवार आहे आणि त्यांच्या सन्मानासाठी व सुरक्षेसाठी मी सदैव कटिबद्ध आहे. जोपर्यंत माझ्या श्वासात-श्वास आहे, तोपर्यंत कोणत्याही शिवसैनिकाच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. विकास, विश्वास आणि ठाम नेतृत्व या बळावर शिवसेना जनतेच्या मनात घर करत आहे. तळागाळातील शेवटच्या घटकातील कार्यकर्त्याच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत असेही ते म्हणाले.
000


