शिवाजी पुन्हा वादात; कॉम्रेड पानसरेवर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी
आ. संजय गायकवाड यांचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

बुलडाणा | प्रतिनिधी
शिवाजी कोण होता’ या पुस्तकावरुन निर्माण झालेल्या वादावर मागील काही दिवसापासून राज्यभरात प्रचंड चर्चा होत आहे. हा विषय शांततेकडे असतांना आता पुन्हा या विषयातून निर्माण झालेल्या विषयाने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बुलडाणा विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड व पदाधिकाऱ्यांनी लेखक काॅम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर मृत्यु नंतर गुन्हा दाखल करण्यात यावा, सदर पुस्तकास पाकिस्तान किंवा चीन मधून फंडींग मिळाली आहे का हे तपासावे, तसेच पुस्तक छापणाऱ्या, विक्री करणाऱ्या बनवणाऱ्या सर्वांवर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. ही मागणी एका निवेदनाद्वारे आ. संजय गायकवाड यांनी २७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात मागणी करण्यात आली आहे की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासह संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असून त्यांच्या नावाचा गैरवापर करून काही लेखक व प्रकाशक आर्थिक फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाद्वारे महाराजांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच महाराजांच्या नावाचा एकेरी उपयोग करुन त्यांच्या नावाने कोटयावधी रुपय कमवणाऱ्या, तसेच लेखकाच्या मृत्युनंतर पुस्तक छापाई करणाऱ्या प्रकाशक प्रशांत आंबी याला अटक करुन प्रेस कॉन्सील ऑफ इंडीया या आयोगाद्वारे भरपाई वसूलण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या पुस्तकाचे आरएनआय प्रमाणपत्र तपासण्यात यावे, आरएनआय नसेल तर पुस्तक जप्त करण्यात यावे, या पुस्तकाचे टायटल सेल तपासण्यात यावे सदर टायटल सेल नसेल तर पुस्तकावर बंदी आणावी, प्रकाशकाकडे डिक्लेरेशन तपासावे नसल्यास प्रकाशकाला अटक करण्यात यावी, संबंधित डीटीपी ऑपरेटर, प्रिंटिंग प्रेस व विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, सदर पुस्तकाला चीन किंवा पाकिस्तानातून फंडींग आहे का, तसेच एखाद्या जिहाद्याने या पुस्तकासाठ आर्थिक मदत केली आहे का हे सीआयडी मार्फत तपासावे, कॉम्रेड पानसरेवर मरण्रोत्तर पोलिस कारवाई करण्यात यावी, या प्रकरणात आवश्यक असल्यास सायबर सेलमार्फतही तपास करून सोशल मीडियाद्वारे या पुस्तकाचा प्रसार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागण्या करण्यात आल्या आहे.
या निवेदनावर शिवसेनेच्या विजय अंभोरे, संदीप गायकवाड, धनंजय बारोटे, संजय हाडे, विजयसिंह राजपूत, जिजा राठोड, अनुजा सावळे, आशिष जाधव, श्रीकांत गायकवाड आदी अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्ये यांच्या सहया आहे.




