पेट्रोल पंपावरील स्वच्छतेवर कारवाई; मग लोणार शहर व बसस्थानकाच्या समस्यांकडे दुर्लक्ष का?
शहरातील कचरा, सार्वजनिक स्वच्छता आणि बसस्थानकावरील पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

लोणार
पेट्रोल पंपांवरील स्वच्छतागृहांच्या अस्वच्छतेबाबत स्थानिक आमदारांनी नाराजी व्यक्त करत तहसीलदारांना कारवाईचे आदेश दिल्यानंतर तालुक्यातील पेट्रोल पंपांना नोटिसा बजावण्यात आल्या. मात्र, या कारवाईच्या पार्श्वभूमीवर लोणार शहरातील इतर मूलभूत समस्यांकडेही लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जागतिक कीर्तीच्या लोणार सरोवराला भेट देण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने येतात. मात्र शहरात प्रवेश करताच रस्त्यांवरील कचऱ्याचे ढीग, उघड्या गटारी आणि सार्वजनिक स्वच्छतेच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याने शहराची प्रतिमा मलिन होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. याशिवाय लोणार एसटी बसस्थानकावर प्रवाशांसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याचा मुद्दाही नागरिकांनी उपस्थित केला आहे. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांत प्रवाशांना पाण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागतो, अशी तक्रार अनेकांनी केली आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, पेट्रोल पंपांवरील स्वच्छतेबाबत प्रशासनाने कारवाई करणे योग्य असले, तरी त्याचवेळी शहरातील सार्वजनिक स्वच्छता, बसस्थानकावरील सुविधा आणि मूलभूत नागरी प्रश्नांवरही तितक्याच गांभीर्याने उपाययोजना व्हायला हव्यात. लोणार हे जागतिक वारसा दर्जासाठी प्रयत्नशील असलेले पर्यटनस्थळ असल्याने शहरातील स्वच्छता, सार्वजनिक शौचालयांची स्थिती आणि मूलभूत नागरी सुविधा सुधारण्याची गरज असल्याचे मतही अनेकांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान, “खाजगी आस्थापनांवर कारवाईसोबतच सरकारी यंत्रणेच्या अखत्यारीतील सुविधा सुधारण्यावरही भर दिला जावा,” अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. शहराचा सर्वांगीण विकास आणि प्रवाशांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.




