भर पावसात पाण्याच्या टाकीवर युवासेनेचे पाच तास ठिय्या आंदोलन
आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आत्मदहनाचा इशारा

मोताळा
तालुक्यातील मोरखेड येथील दहा गाव पाणीपुरवठा योजनेतून होणारा दूषित पाणीपुरवठा तातडीने बंद करून नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, या प्रमुख मागणीसाठी युवासेनेच्या वतीने भर पावसात पाण्याच्या टाकीवर चढून तब्बल पाच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले.
मोरखेड दहा गाव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत मलकापूर तालुक्यातील मोरखेड, दुधलगाव, लोणवडी, खामखेड, गौलखेड, आळंद, हरणखेड तसेच मोताळा तालुक्यातील न्हावी, दाभाळी आणि माकोडी या दहा गावांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून या गावांमध्ये दूषित व अस्वच्छ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने ठोस उपाययोजना न केल्याचा आरोप करत युवासेनेचे उप जिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, माजी तालुकाप्रमुख गणेश सुशिर यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी भर पावसात पाण्याच्या टाकीवर चढून ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी आंदोलनकांनी “साहेब पिता आर.ओ.चं पाणी… आम्हाला मात्र सांडपाणी”, “शुद्ध पाणी हा आमचा हक्क आहे”, “बंद करा, बंद करा… जिवाशी खेळणं बंद करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. या आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकारी माने यांनी घटनास्थळी येऊन आंदोलकांशी चर्चा केली. पाणीपुरवठ्याची गुणवत्ता तपासून तातडीने शुद्ध पाणीपुरवठा करण्याबाबत लेखी आश्वासन देण्यात आले. त्यानंतर आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले.
या आंदोलनात युवासेना उपजिल्हाप्रमुख शुभम घोंगटे, माजी तालुकाप्रमुख गणेश सुशिर, जगदीश पाटील, विलास पाटील, चेतन पाटील, गणेश दीक्षित, कृष्णा पाटील, गौरव ठोसर, ईश्वर झनके, लक्ष्मण भिस्ते यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दरम्यान, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वसंतराव भोजने, उपजिल्हाप्रमुख गजानन ठोसर आणि अजय सावळे यांनी मध्यस्थी करत प्रशासनाशी समन्वय साधला. त्यांच्या हस्तक्षेपानंतर लेखी आश्वासन मिळाल्याने आंदोलनाची सांगता झाली.
00




