गुरुचरणी समर्पणातूनच जीवनाला मिळते दिशा : डॉ. विकास बाहेकर

बुलडाणा,
गुरु हा केवळ व्यक्ती नसून जीवनाला योग्य दिशा देणारे तत्त्व आहे. गुरुच्या मार्गदर्शनाला अनन्य भावाने शरण गेल्यास ज्ञान, आनंद व आत्मिक समाधानाचा अनुभव मिळतो, असे प्रतिपादन ह.भ.प. डॉ. विकास बाहेकर यांनी केले.
ते, स्वरसाधना संगीत विद्यालयाच्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. सदर कार्यक्रम नुकतेच येथील अजिंक्यवैभव मंगल कार्यालयाच्या सभागृहात पार पडला. यावेळी कार्यक्रमात संगीत विद्यालयाचे संचालक अरविंद टाकळकर, संगीत शिक्षिका भाग्यश्री टाकळकर, योगांजली योग वर्गाच्या संचालिका अंजली परांजपे यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्याची सुरुवात संस्थापक स्व. रा. गो. टाकळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली. दरम्यान यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना डॉ. बाहेकर म्हणाले की, स्वरसाधना ही ईश्वरसाधनेचा मार्ग असून संगीत मनाला एकाग्रता, शांती आणि समाधान देते. गुरु शिष्याच्या व्यक्तिमत्त्वाला योग्य आकार देत त्याच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणतात. गुरुच्या कृपेमुळे आत्मिक उन्नती साधता येते, असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात गुरुवंदना तसेच स्व. किरण टाकळकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित ‘आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा’ या स्मृतिगंध सादरीकरणात विद्यार्थ्यांनी भक्तिगीते, अभंग, गवळणी, भावगीते तसेच वाद्यसंगीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली. विविध वयोगटातील विद्यार्थ्यांच्या सुरेल सादरीकरणामुळे सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले. समारोप प्रसंगी अरविंद टाकळकर यांनी संगीत हे तणावमुक्त, आनंदी आणि संतुलित जीवनासाठी प्रभावी माध्यम असल्याचे सांगितले. शालेय शिक्षणासोबत संगीताची साधना करून उत्कृष्ट यश संपादन करणाऱ्या विवेक सोनुने यांचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रविकिरण टाकळकर यांनी केले, तर सूत्रसंचालन व निवेदन श्रुती तायडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शार्दुल सोनुने आणि हर्षल तायडे यांनी विशेष परिश्रम घेतले. पालक, संगीतप्रेमी आणि रसिकांची लक्षणीय उपस्थिती होती.
विद्यार्थ्यांच्या सुरेल सादरीकरणाने रंगला गुरुवंदना सोहळा
गुरुपौर्णिमा कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अभंग, भक्तिगीते, भावगीते तसेच वाद्यसंगीताच्या आकर्षक सादरीकरणातून गुरूप्रती असलेली कृतज्ञता व्यक्त केली. हार्मोनियम, सिंथेसायझर आणि तबल्याच्या सुरेल साथीमुळे प्रत्येक सादरीकरणाला उपस्थित रसिकांकडून उत्स्फूर्त दाद मिळाली. ‘अच्युतम् केशवम्’, ‘केशवा माधवा’, ‘गुरु माझे गणगोत’, ‘देव माझा विठू सावळा’ यांसारख्या गीतांनी कार्यक्रमात भक्तिमय वातावरण निर्माण केले.
शिक्षणासोबत संगीत साधणाऱ्या विद्यार्थ्याचा गौरव
शालेय शिक्षण आणि संगीत या दोन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय यश मिळविल्याबद्दल विद्यार्थी विवेक सोनुने यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. नियमित संगीत साधना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासह अभ्यासातील एकाग्रता वाढविण्यास उपयुक्त ठरते, असा संदेश यावेळी देण्यात आला.



