काजूकतलीत जिवंत अळ्या; ५४ पाकिटांचा साठा सील
बुलढाण्यातील रिलायन्स मॉलवर अन्न व औषध प्रशासनाची कार्यवाई

बुलढाणा :
शहरातील रिलायन्स मॉलमधून खरेदी केलेल्या काजूकतलीत जिवंत अळ्या आणि बुरशीसदृश थर आढळल्याच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (८ ऑगस्ट) मॉलमध्ये तपासणी केली. ‘सीताश्री-लक्ष्मीनारायण’ या ब्रँडच्या काजूकतलीची ५४ पाकिटे ताब्यात घेत प्रशासनाने त्यांची विक्री तत्काळ थांबविली. या साठ्याची किंमत १० हजार २३८ रुपये आहे.
एका ग्राहकाने मॉलमधून काजूकतलीचे पाकीट खरेदी केले होते. घरी पाकीट उघडल्यानंतर मिठाईवर बुरशीसदृश थर आणि जिवंत अळ्या दिसल्याचा दावा ग्राहकाने केला. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार करण्यात आली. तक्रारीतील पाकिटावर ८९०६१५१४२२०१७ हा बारकोड नमूद असल्याची माहिती आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी जी. के. वसावे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शुक्रवारी सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत मॉलमधील संबंधित उत्पादनाच्या साठ्याची तपासणी केली. उपलब्ध काजूकतलीच्या अन्य बॅचमधील नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून मॉलमध्ये शिल्लक असलेल्या संबंधित ब्रँडच्या सर्व ५४ पाकिटांची विक्री रोखण्यात आली.
> “ग्राहकाने खरेदी केलेल्या एका पाकिटात जिवंत अळ्या आढळल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार मॉलची तपासणी करून संबंधित उत्पादनाचे नमुने घेण्यात आले. उपलब्ध साठा ताब्यात घेऊन त्याची विक्री थांबविण्यात आली आहे. पुढील कार्यवाही अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींनुसार केली जाईल,” असे अन्न सुरक्षा अधिकारी जी. के. वसावे यांनी सांगितले.
मिठाईतील दोष उत्पादन, वाहतूक किंवा साठवणुकीच्या कोणत्या टप्प्यावर निर्माण झाला, याची प्रशासनाकडून पडताळणी केली जाणार आहे. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्यानुसार ग्राहकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी उत्पादकासह वितरक आणि विक्रेत्यावरही आहे. या घटनेमुळे सणासुदीच्या काळातील पॅकबंद मिठाईची गुणवत्ता आणि साठवणूक व्यवस्थेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.




