उद्घाटनाआधीच पथदिव्यांचे खांब कोसळले; लोणारच्या सुशोभीकरणाच्या कामावर प्रश्नचिन्ह
पालखी मार्गावरील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर; निकृष्ट कामाची चौकशी करण्याची नागरिकांची मागणी

लोणार
पर्यटननगरी लोणारला सुशोभित करण्यासाठी नगर परिषदेकडून सुरू असलेल्या कामाच्या दर्जावर पहिल्याच टप्प्यात प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहरातील मुख्य मार्गावर नव्याने उभारण्यात आलेल्या आकर्षक पथदिव्यांपैकी काही खांब उद्घाटनापूर्वीच कोसळल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे, याच मार्गावरून लवकरच श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होणार असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
शहरातील प्रमुख रस्ते आणि चौकांचे सुशोभीकरण करण्यासाठी नगर परिषदेमार्फत विविध कामे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुख्य मार्गावर नवीन पथदिवे उभारण्यात आले. मात्र, हे काम पूर्ण होण्यापूर्वीच काही खांब जमिनीवर कोसळल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांकडून सवाल उपस्थित केले जात आहेत. खांब नेमके कोणत्या कारणामुळे कोसळले, त्यासाठी वापरण्यात आलेले साहित्य दर्जेदार होते का, तसेच बसविताना तांत्रिक निकषांचे पालन झाले का, याची तपासणी होणे गरजेचे आहे. लोणार शहरातून श्री संत गजानन महाराजांच्या पालखी सोहळ्याचे आगमन होत असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. पालखीच्या स्वागतासाठी नागरिक आणि वारकरी मोठ्या संख्येने रस्त्यावर येतात. अशा गर्दीच्या मार्गावर पथदिव्यांचे खांब कोसळण्याची घटना घडल्याने प्रशासनाने तातडीने या संपूर्ण मार्गाची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.
कामाची गुणवत्ता तपासण्याची मागणी
सुशोभीकरणाच्या कामासाठी खर्च होणारा निधी सार्वजनिक असल्याने प्रत्येक कामाची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्याची जबाबदारी नगर परिषदेची आहे. त्यामुळे कोसळलेल्या खांबांची तांत्रिक तपासणी करून दोष स्पष्ट करावेत, संपूर्ण मार्गावरील पथदिव्यांची सुरक्षितता तपासावी आणि दोष आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पालखी सोहळ्यापूर्वी प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात. अन्यथा एखादी दुर्घटना घडल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्यापेक्षा आधीच खबरदारी घेणे अधिक महत्त्वाचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.




