संगम चौक अपघात प्रकरण; स्पोर्ट्स बाईकचालक अद्याप ही मोकाट

भरधाव दुचाकीच्या धडकेत दोघे गंभीर जखमी; अपघातनंतर चालकासह साथीदाराचा पलायनाचा प्रयत्न
प्रतिनिधी | बुलडाणा
शहरातील संगम चौकात भरधाव स्पोर्ट्स बाईकने दुचाकीला दिलेल्या धडक प्रकरणी शहर पोलिसात अखेर स्पोर्ट्स बाईकचालक विरोधात तक्रार देण्यात आली आहे. मात्र, आरोपी अद्याप ही पोलिसांच्या ताब्यात आला नसून दोन दिवसानंतर ही मोकाट असल्याची माहिती आहे. दरम्यान १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडलेल्या या अपघातात जिल्हा परिषद येथील कर्मचारी वैभव दिलीप डांगे हे गंभीर जखमी झाले होते. अपघातानंतर बाईकचालक व त्याचा साथीदार घटनास्थळावरून पसार झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला होता.
पोलिसाकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील रहिवासी ज्ञानेश्वर वाकोडे व त्यांचे मित्र वैभव डांगे हे चहा घेण्यासाठी संगम चौक परिसरातून जात होते. यावेळी विरुध्द दिशेने भरधाव वेगाने आलेले वाहन क्रमांक एमएच २१ बीपी १२०१ या स्पोर्ट्स बाईकने वाकाेडे यांच्या दुचाकी क्रमांक एमएच ३२ एक्स ४७६० ला जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरदार होती की दुचाकीवरील व्यक्ती रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.अपघातानंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. जखमी वैभव डांगे यांना ज्ञानेश्वर वाकोडे यांनी तातडीने शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, अपघातास कारणीभूत ठरलेला स्पोर्ट्स बाईकचालक व त्याच्यासोबतचा तरुण घटनास्थळावरून फरार झाले.
या प्रकरणी ज्ञानेश्वर वाकोडे यांच्या तक्रारीवरुन पोलिसात तक्रार देण्यात आली आहे, मात्र १६ ऑगस्ट पर्यत सदर आरोपी पोलिसांच्या ताब्यात आला नसल्याची माहिती तपास अधिकारी खवले यांनी सांगितली. सदर बाइक तिसऱ्याच व्यक्तीची असून तो देखील दवाखान्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
तपास यंत्रणा मंदावली
बुलडाणा सारख्या छोटयाश्या शहरात वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या अपघातापश्चात आरोपीच्या विरोधात केवळ तक्रार देण्यात आली. ही तक्रार दाखल करण्यात आली का?, दाखल करण्यात आली तर आरोपीस अटक का करण्यात आली नाही, त्यांची नावे समोर का आली नाही अशी अनेक प्रश्न उपस्थित राहत असल्याने शहरात तपास यंत्रणा मंदावल्याची चर्चा होत आहे.



