भरधाव रेती टिप्परची दुचाकीला समोरासमोर धडक ; शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

लोणार,

भरधाव वेगाने रेतीवाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बुधवारी २७ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अंजनीखुर्द परिसरात घडली. या अपघातानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली असून संतप्त नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करत रेतीवाहतुकीवर नियंत्रण आणण्याची मागणी केली.
प्राप्त माहितीनुसार, उदनापूर (ता. लोणार) येथील अल्पभूधारक शेतकरी गजानन हरिभाऊ मुळे (वय ४४) हे दुचाकी क्रमांक एमएच २८ सीए ६८३० ने सुलतानपूर येथून परत उदनापूर या आपल्या गावी परतत होते. दरम्यान, अंजनी खुर्द जवळील मैत्री हॉटेलसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या रेती वाहतूक करणाऱ्या टिप्पर क्रमांक एमएच २८ बीबी ८३०२ वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने सदर दुचाकी व टिप्परची समोरासमोर जोरदार धडक झाली. टिप्पर चालक योगेश रामराव देशमुख (वय २९, रा. आध्रुड, ता. मेहकर) हा भरधाव वेगात वाहन चालवत असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. दरम्यान ही धडक इतकी भीषण होती की गजानन मुळे यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर दुचाकीचा चक्काचूर झाला असून घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपी चालकावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करत काही नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष खाडे, मेहकरचे पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी नागरिकांची समजूत काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच काही वेळात वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी पोहेकॉ. लक्ष्मण कटक व शिवानंद केदार यांनीही मदतकार्य केले.

कुटुंबाचा आधार हरपला
अपघातात मृत्यू झालेल्या गजानन हरिभाऊ मुळे हे कुटुंबातील एकमेव कमावते व्यक्ती होते. त्यांच्या अकाली निधनामुळे मुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार असून उदनापूर गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच लोणारचे तहसीलदार भूषण पाटील यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. पंचनामा करून संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

रेतीवाहतुकीवर नियंत्रणाची मागणी
अंजनीखुर्द मार्गावर वैध व अवैध रेतीवाहतूक करणारी वाहने भरधाव वेगाने धावत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. अनेक टिप्परवर सुरक्षेसाठी आवश्यक ताडपत्री अथवा आवरण नसल्याने रस्त्यावरून उडणारी रेती दुचाकीस्वारांच्या डोळ्यांत जात असून अपघाताचा धोका वाढत आहे. या मार्गावर यापूर्वीही अनेक छोटे-मोठे अपघात घडल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे रेतीवाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करून वेगमर्यादा लागू करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून होत आहे.

 

तणावाचे वातावरण आणि पोलिसांची कारवाई

अपघाताची माहिती मिळताच परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रसंगावधान राखून पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवून वाहतूक सुरळीत केली. यावेळी डीवायएसपी संतोष खाडे साहेब, आलेवार साहेब, लक्ष्मण कटक सर, नागरे साहेब आणि केदार साहेब यांच्यासह पोलीस प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी सुलतानपूर येथील प्रतिष्ठान नागरिक शेख खाजा शेख उमर व शेख खाजा शेख अख्तर यांनीसुद्धा सहकार्य केले.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!