पालिकेचे दुर्लक्ष; प्रभाग आठ मध्ये नाल्या चोकअप झालयाने नागरिक त्रस्त
सुरज यादव यांचे पालिकेला अल्टीमेटम, गणेशोत्सवापूर्वी नाले सफाई करा अन्यथा आंदोलन

प्रतिनिधी | खामगाव
शहरातील प्रभाग आठ सह इतर अनेक ठिकाणी नाल्या चोकअप झाल्याने पाणी साचले आहे. परिणामी या पाण्याच्या दुर्गंधेने परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे. या संदर्भात नागरिकांनी अनेकवेळा पालिकेकडे तक्रार केली आहे, तरीही याकडे पालिका सातत्याने दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सुरज यादव यांनी पालिकेला गणेशोत्सव पर्यतचे अल्टीमेटम दिले आहे. सदर इशारा निवेदनाद्वारे १९ ऑगस्ट रोजी देण्यात आला आहे.
गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील मानाचा लाकडी गणपती मंदिर व खाटू श्याम मंदिर परिसरातील कमान गेटजवळील मुख्य नालीत ओसंडून पाणी भरले आहे. कचरा व गाळामुळे सदर नाल्या ब्लाक झाल्या आहे. परिणामी नाल्यातील पाणी वाहत नसल्याने या भागात राहणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. सुमारे सहा महिन्यांपासून ही नाली पूर्णपणे चोकअप झाल्याने परिसरातील विविध गल्लीतील सांडपाणी रस्त्यावर वाहत असून नागरिकांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळयाचे दिवस आहे, त्यामुळे नालीतील सांडपाणी रस्त्यावर साचत असल्याने परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांनाही यातूनच वाट काढावी लागत आहे. यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. याशिवाय सण-उत्सव आणि विविध मिरवणुकांच्या वेळी याच परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला जातो. त्यामुळे पोलिस कर्मचाऱ्यांनाही तासनतास अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त वातावरणात कर्तव्य बजावावे लागते. त्यामुळे सदर प्रकरणाची पालिकेने तातडीने दखल घ्यावी व नाल्याची दुरुस्ती करण्यात यावी, सदर मुख्य नालीची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करुन, आवश्यकतेनुसार रुंदीकरणव स्वच्छ करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सदर मागणी गणेशोत्सवापूर्वी पुर्ण करण्यात आली नाही तर परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते सुरज यादव यांनी नगर परिषद प्रशासनाला दिला आहे.




