सुलतानपूर बसथांब्यावर मूलभूत सुविधांचा अभाव; स्वच्छतागृहाभोवती अतिक्रमणामुळे महिलांची गैरसोय

सुलतानपूर,

 दोन राज्य महामार्गांना जोडणारे महत्त्वाचे ठिकाण असलेल्या सुलतानपूर येथील बसथांबा सध्या प्रवाशांसाठी गैरसोयीचा ठरत आहे. दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थी, महिला, नोकरदार आणि इतर प्रवाशांची वर्दळ असतानाही बसथांबा परिसरातील मूलभूत सुविधांकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बसथांब्यावरील सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या परिसरात अतिक्रमण वाढल्याने स्वच्छतागृहाकडे जाणारा मार्गच अरुंद व अडथळ्यांचा झाला आहे. त्यातच कचरा, दुर्गंधी आणि अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे परिसराची अवस्था बिकट झाली असून, विशेषतः महिला व विद्यार्थिनींची मोठी गैरसोय होत आहे.

सुलतानपूरमध्ये विविध शाळा, महाविद्यालये, पॉलिटेक्निक, फार्मसी, नर्सिंगसह उच्च शिक्षणाच्या संस्था आहेत. त्यामुळे दररोज मोठ्या संख्येने विद्यार्थिनी बसथांब्यावर ये-जा करतात. अशा परिस्थितीत सार्वजनिक स्वच्छतागृहाची सुरक्षित, स्वच्छ आणि सुलभ सुविधा उपलब्ध असणे आवश्यक असताना प्रत्यक्षात मात्र अतिक्रमणामुळे त्याचा वापर करणेच कठीण झाले आहे. या समस्येबाबत ग्रामस्थांनी दि. 24 ऑगस्ट रोजी सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत सुलतानपूर यांना लेखी निवेदन दिले आहे. स्वच्छतागृह परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून अतिक्रमणे तातडीने हटवावीत, परिसराची नियमित स्वच्छता करावी, पुरेशी प्रकाश व्यवस्था करावी तसेच स्वच्छतागृहाची नियमित देखभाल करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. दरम्यान, मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास कष्टकरी संघाच्या वतीने ग्रामस्थ व प्रवाशांना सोबत घेऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. “बसची वाट पाहताना महिलांना स्वच्छतागृहाची गरज भासते; मात्र सध्याच्या परिस्थितीत तेथे जाणेही असुरक्षित व गैरसोयीचे वाटते. प्रशासनाने महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून तातडीने व्यवस्था सुधारावी,” अशी प्रतिक्रिया महिला प्रवाशांनी व्यक्त केली. पुरुष प्रवाशांनीही बसथांब्यावर दररोज मोठी गर्दी होत असल्याने स्वच्छतागृहासह इतर मूलभूत सुविधांची गरज असल्याचे सांगितले.

निवेदनावर रमेश रिंढे, भाऊराव भालेराव, सागर पनाड, राजेश पिंपरकर, दत्तात्रय रिंढे, दामोधर कुडके, शिवशंकर निलक, गणेश रत्नपारखी, रामा जुमडे, प्रकाश साखरे आणि गजानन मापारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या मागणीला शेकडो ग्रामस्थ व प्रवाशांचा पाठिंबा असल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे.

 

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!