नवयुवक सार्वजनिक गणेश मंडळाच्या समाजोपयोगी उपक्रमांचे कौतुक; स्मिता म्हसाये यांची सदिच्छा भेट

 

धामणगाव बढे

नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, पान्हेरा येथे स्मिता म्हसाये मॅडम, सहाय्यक आयुक्त, राज्य गुप्तचर विभाग यांनी सदिच्छा भेट देऊन मंडळाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व पर्यावरणपूरक उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली.

गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक कार्यक्रम न घेता समाजोपयोगी उपक्रमांची प्रभावी सांगड घालण्याचे काम मंडळाकडून केले जात असल्याचे यावेळी दिसून आले. मंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्त संकलन करण्यात आले. तसेच मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिरात २६० रुग्णांना उपचाराचा लाभ मिळाला.

पर्यावरण संवर्धनासाठी मंडळाने विशेष पुढाकार घेतला असून शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था, प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव तसेच १० दिवस निर्माल्य संकलन करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती असे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या खताचा वापर करून वृक्षांचे संगोपन करण्याचा उपक्रमही मंडळाने हाती घेतला आहे.

📚 शिक्षण व संस्कारांवर भर

मंडळाच्या वतीने बालसंस्कार शिबिर, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा, शैक्षणिक साहित्य वाटप, पुस्तकवारी, वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणारे उपक्रम तसेच पारंपरिक वेशभूषा व लोककला संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महिला सशक्तीकरण, बालसंस्कार व कुटुंबव्यवस्था या विषयावर वैशालीताई तायडे, बुलढाणा यांचे मार्गदर्शनही आयोजित करण्यात आले.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मान उपक्रम, आरोग्य व व्यसनमुक्तीविषयी जनजागृती, ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून मंडळाने समाजातील विविध घटकांना जोडण्याचा प्रयत्न केला आहे.

“२० वर्षे भक्तीची… २० वर्षे समाजसेवेची!” या संकल्पनेतून ग्रामीण भागातील मंडळाने राबविलेल्या विविध लोकोपयोगी उपक्रमांचे स्मिता म्हसाये यांनी कौतुक केले आणि मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.

पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारणाऱ्या मूर्तिकाराचा सन्मान
यावेळी नवयुवक सार्वजनिक गणेश उत्सव मंडळासाठी मूर्तिकार श्री. प्रवीण किन्होळकर यांनी साकारलेल्या ६ फूट उंचीच्या आकर्षक पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचे विशेष कौतुक करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही मूर्ती साकारल्याबद्दल स्मिता म्हसाये यांच्या हस्ते श्री. प्रवीण किन्होळकर यांना ‘उत्कृष्ट मूर्तिकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ग्रामीण भागातील गणेशोत्सवाला सामाजिक कार्याची दिशा देत विविध उपक्रम राबविणाऱ्या मंडळाच्या कार्याला मिळालेली ही कौतुकाची थाप कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!