खामगावात १५ बेवारस गोवंशांवर उपचार; १२ गोवंशांना जीवदान

खामगाव : अपघातात गंभीर जखमी झालेल्या, विषबाधा झालेल्या तसेच विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या बेवारस गोवंशांना उपचार मिळवून देत एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशनने सेवाभावाचा आदर्श घालून दिला आहे. १२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शहरातील विविध भागांत जखमी व आजारी असलेल्या १५ गोवंशांवर संस्थेच्या गौसेवकांनी उपचार केले. यापैकी १२ गोवंशांचे प्राण वाचविण्यात यश आले, तर उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तीन गोवंशांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शहरातील विविध भागांत सेवा कार्य
शहरातील मेनरोड फरशी, भगतसिंग चौक, सनी पॅलेस, शिवाजी वेस, आईसाहेब मंगल कार्यालय परिसर, बसस्थानक, गोकुळ नगर, सावजी लेआऊट, महाकाल चौक, गजानन नगरी, पंढरी बाबा नगर, तलाव रोड, शामल नगर, बारादरी, मस्तान चौक आणि भुसावळ चौक आदी भागांत हे सेवाकार्य राबविण्यात आले. रस्त्यांवर अपघातग्रस्त अवस्थेत आढळणाऱ्या तसेच आजारपणामुळे त्रस्त असलेल्या गोवंशांना वेळेवर उपचार मिळावेत, या उद्देशाने फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.
गौसेवकांचे मोलाचे योगदान
या सेवाकार्यात गौसेवक सुरजभैय्या यादव, डॉ. नितीन गायकवाड, डॉ. राज देशमुख, डॉ. रंजीत राठोड, डॉ. शुभम जरांगे, पवन घडेकर, डॉ. ऋषीकेश बोरे, गजानन माकोडे, किसन गांधी, मोहन शर्मा, गौरव कवटेकर, सुरज निंबाळकर, अतुल निमकर्डे, सागर जाधव, प्रवीण ठाकरे, शिवा मंडोकार, दर्शन पवार, अभिषेक गावंडे, यश टिकार, गोलू शर्मा, राहुल ठाकुर, अविनाश इंगळे, दुर्गेश सारसर, संजय थोरात, प्रदीप शमी, चेतन कदम आणि योगेश राऊत यांनी सहकार्य केले.
विशेष म्हणजे, या संपूर्ण उपचारकार्याचा खर्च एकनिष्ठा गौ सेवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आला. मुक्या प्राण्यांच्या वेदना ओळखून त्यांच्या मदतीसाठी धावून जाणाऱ्या या उपक्रमातून संस्थेची प्राणिमात्रांप्रती असलेली संवेदनशीलता अधोरेखित झाली आहे.



