राज्यस्तरीय “समाज भूषण पुरस्काराने” कविता राठोड सन्मानित

प्रतिनिधी | बुलडाणा
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंतर्गत नैसर्गिक मानवाधिकार सुरक्षा परिषद फोरमच्या वतीने सन २०२५-२६ या वर्षाकरिता बुलडाणा जिल्ह्यातील जिल्हा संघटन आयुक्त कविता सकरुजी राठोड यांना “समाज भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य तसेच राष्ट्रीय व राज्यस्तरीय उपक्रमांमध्ये विशेष कौशल्य दाखवल्याबद्दल हा सन्मान देण्यात आला आहे.
कविता राठोड यांनी २०१२ मध्ये महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड, मुंबई येथे रुजू होऊन आपल्या सेवेला सुरुवात केली. उस्मानाबाद व परभणी येथे कार्य केल्यानंतर त्यांनी यवतमाळ येथे जिल्हा संघटन आयुक्त (गाईड) म्हणून जबाबदारी सांभाळली. मोठ्या जिल्ह्यात काम करताना त्यांनी शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
स्काऊट-गाईडच्या माध्यमातून त्यांनी समुदाय विकास, बेटी बचाव बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन, रक्तदान शिबिरे, अन्नदान, पाणपोई यांसारखे अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवले. तसेच मुलींच्या सक्षमीकरणासाठी मानसिक आरोग्य, सेल्फ कॉन्फीडन्स, गुड टच बॅड टच, आदी विषयावर कार्यशाळा घेऊन ५,००० पेक्षा अधिक मुलींना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३१२ मुलींनी राज्य पुरस्कार प्राप्त केला असून ७०० पेक्षा अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच त्यांनी कर्नाटक (मैसूर), राजस्थान (पाली) व उत्तर प्रदेश (लखनऊ) येथे राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे.
सध्या त्या सामाजिक, शैक्षणिक व योग क्षेत्रात विविध जबाबदाऱ्या सांभाळत असून समाजसेवेत सक्रिय आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना “समाज भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे.
राठोड यांच्या कार्याची ठळक वैशिष्ट्ये
कविता पवार/राठोड यांनी स्काऊट-गाईडच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून समाजोपयोगी कार्य करताना शिक्षण, आरोग्य व सामाजिक जागृती या क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ३१२ मुलींनी राज्य पुरस्कार प्राप्त केला असून ७०० पेक्षा अधिक शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच ५,००० पेक्षा अधिक मुलींना विविध विषयांवर मार्गदर्शन करून त्यांच्यात आत्मविश्वास व जागरूकता निर्माण केली आहे. बेटी बचाव-बेटी पढाव, अंधश्रद्धा निर्मूलन, रक्तदान व अन्नदान यांसारख्या उपक्रमांतून त्यांनी समाजाशी घट्ट नाळ जोडली आहे.
कविता यांचा प्रेरणादायी प्रवास
कविता पवार/राठोड यांचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. कुटुंबातून मिळालेल्या शिस्तीच्या संस्कारांमुळे त्यांनी समाजसेवेचा मार्ग स्वीकारला. स्काऊट-गाईडच्या माध्यमातून कार्य करत असताना त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये काम करत अनुभव संपादन केला आणि समाजासाठी कार्य करण्याची जिद्द अधिक बळकट केली. त्यांच्या या प्रवासात कुटुंबीय, पती लक्ष्मण राठोड, तसेच वरिष्ठ अधिकारी व सहकाऱ्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आज त्या पे बॅक टू सोसायटी या भावनेतून सातत्याने समाजासाठी कार्यरत असून अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहेत.




