उष्णाच्या तडाख्याने भररस्त्यात धावत्या कारला आग; चौघांचा थरारक बचाव

मुंबई,
येथील उल्हासनगर भागात भररस्त्यात धावत्या कारला अचानक आग लागल्याची घटना घडली. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, कारमधील चार जणांनी वेळीच बाहेर पडत प्रसंगावधान राखल्याने मोठी दुर्घटना टळली. ही घटना १० मे रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कार प्रवास करत असताना अचानक इंजिनच्या भागातून धूर निघू लागला. काही क्षणांतच कारने पेट घेतला आणि आगीच्या ज्वाळांनी संपूर्ण वाहन वेढले. चालकाने तत्काळ वाहन रस्त्याच्या कडेला थांबवून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे चारही जणांचा जीव थोडक्यात बचावला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र तोपर्यंत कार मोठ्या प्रमाणात जळून खाक झाली होती. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
प्राथमिक माहितीनुसार, प्रचंड उष्णता, इंजिन ओव्हरहिट होणे किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यात वाढत्या तापमानामुळे वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे आणि अकोला येथेही अशाच प्रकारच्या घटना समोर आल्या होत्या




