लोणार शहरात रोजच अवैध प्रवासी वाहतुकीचा धुमाकूळ; पोलिस प्रशासनासह लोकप्रतिनिधी सिद्धार्थ खरात यांचे ही दुर्लक्ष?

लोणार:
जागतिक कीर्तीचे पर्यटन स्थळ आणि ऐतिहासिक वारसा लाभलेल्या लोणार शहरासह संपूर्ण तालुक्यात अवैध प्रवासी वाहतुकीने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या (एसटी) नियोजनशून्य कारभारामुळे ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. याचाच गैरफायदा घेत खाजगी वाहनधारकांकडून प्रवाशांची राजरोसपणे लूट आणि जीवघेणी कोंबाकोंबी केली जात आहे. दररोज हजारो नागरिक, महिला आणि शाळकरी विद्यार्थी जीव मुठीत धरून हा प्रवास करत असताना, या कडे पोलिसा प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधी सिद्धार्थ खरात यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा घणाघाती आरोप आता जनतेतून केला जात आहे.
लोणार ते सुलतानपूर, किनगाव जट्टू , लोणी आणि बीबी या प्रमुख मार्गांवर धावणाऱ्या खाजगी जीप, ट्रॅक्स, आणि ऑटो रिक्षांमध्ये वाहतुकीच्या सर्व नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. चालकाच्या दोन्ही बाजूंना धोकादायकरित्या प्रवासी बसवले जातात. इतकेच नव्हे, तर वाहनांच्या पाठीमागे लटकून प्रवाशांची ने-आण केली जात आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तर या वाहनांमध्ये गुरांसारखी कोंबाकोंबी होते. भरधाव वेगाने धावणाऱ्या या वाहनांमुळे लोणार परिसरात कधीही मोठा आणि दुर्दैवी अपघात घडण्याची भीती निर्माण झाली आहे.
ग्रामीण भागातून लोणार शहरात येण्यासाठी वेळेवर शासकीय बसेस उपलब्ध नसणे, हेच अवैध वाहतूक वाढण्याचे मुख्य कारण आहे. अनेक महत्त्वाच्या मार्गांवर बसेसच्या पुरेशा फेऱ्या नाहीत. तासांन् तास वाट पाहून हताश झालेले प्रवासी अखेर वेळेवर पोहोचण्यासाठी या बेकायदेशीर खाजगी वाहनांचा आसरा घेतात. एसटी महामंडळाच्या विस्कळीत नियोजनामुळे शासकीय महसुलाचे मोठे नुकसान होत असताना, दुसरीकडे मात्र खाजगी वाहतूकदारांचे खिसे गरम होत आहेत.
लोकप्रतिनिधी शांत का? !
लोणार-मेहकर मतदारसंघाचे आमदार म्हणून मतदारसंघातील दळणवळणाचा आणि जनतेच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवणे ही आमदार सिद्धार्थ खरात यांची प्राथमिक जबाबदारी आहे . निवडणुका संपल्यानंतर जनतेच्या या दैनंदिन आणि जीवघेण्या प्रश्नाकडे आमदारांनी पूर्णपणे पाठ फिरवली आहे. “मतदारांना मृत्यूच्या सापळ्यात ढकलून लोकप्रतिनिधी नक्की कोणाचे हित साधत आहेत?” असा संतप्त सवाल आता नागरिक करत आहेत.
पोलीस आणि आरटीओ (RTO) ची मूकसंमती?
शहरातील मुख्य चौक आणि थेट बस स्थानक परिसराच्या २०० मीटरच्या मर्यादेतच ही अवैध वाहने खुशाल उभी राहून प्रवासी भरतात. राज्य शासनाच्या परिवहन विभागामार्फत राज्यभरात अवैध वाहतुकीवर कडक फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिलेले असतानाही, लोणारमध्ये मात्र परिस्थिती गंभीर आहे. स्थानिक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) केवळ नावालाच दंडात्मक कारवाईची औपचारिकता पूर्ण करतात. स्थानिक पातळीवरील कथित आर्थिक हितसंबंधांमुळेच या माफियावर कोणतीही कायमस्वरूपी कडक कारवाई केली जात नसल्याची चर्चा आता उघडपणे शहरात रंगू लागली आहे. लोणार परिसरात एखादा मोठा अपघात घडून निष्पाप नागरिकांचा बळी जाण्याची प्रशासन आणि लोकप्रतिनिधी वाट पाहत आहेत का? आमदार सिद्धार्थ खरात यांनी तात्काळ या प्रकरणात गांभीर्याने लक्ष घालून पोलीस आणि आरटीओ प्रशासनाची संयुक्त बैठक घ्यावी. लोणार तालुक्यातील नागरिकांना हक्काची आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था मिळवून देऊन आमदार खरातानी आपले कर्तव्य पूर्ण करावे अशी मागणी नागरिक करत आहे.



