संग्रामपूरात बोगस एचटीबीटी कापूस बियाण्यांचा पर्दाफाश; ८ लाख ५८ हजाराचा माल जप्त
खळबळजनक : खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना फसवणारी टोळी सक्रिय

प्रतिनिधी | संग्रामपूर
खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना आपल्या जाळयात फसवून बोगस एचटीबीटी कापूस बियाणे विक्री करणाऱ्या टोळीतील तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला, तर एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. ही कार्रवाई २६ मे रोजी कृषी विभाग व पोलिस प्रशासनाच्यावतीने संयुक्तरित्या करण्यात आली. दरम्यान यावेळी पथकाने आरोपी जवळून सुमारे ८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
खरीपाच्या तोंडावर जिल्हयाभरातील शेतकरी हे पेरणीच्या तयारीला लागले आहे. जिल्हयातील शेतकऱ्यावर मागील काही महिन्यापासून आधिच विविध नैसर्गिक संकटे येत आहे, त्यामुळे शेतकरी वर्ग त्रस्त झालेला आहे. अनेक शेतकऱ्यांचे नैसर्गिक संकटामुळे कंबरडे मोडलेले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आता पुन्हा सगळी ताकत लावून खरीपाच्या पेरणीची तयारीला लागला आहे, तर दुसरीकडे जिल्हयातील विविध तालुक्यात बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांची टोळी सक्रीय झाली आहे. या परिसरात सदर टोळी मागील अनेक दिवसापासून सक्रिय होती. दरम्यान २६ मे रोजी सदर टोळी एचटीबीटी प्रतिबंधित कापूस बियाण्याची विक्री करणार असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे कृषी विभागाने तातडीने हालचाल करत संबंधित तालुका तसेच लगतच्या दोन तालुक्यांच्या प्रमुख रस्त्यांवर बियाणे निरीक्षकांना तपासणीसाठी तैनात केले. त्यानंतर कृषी विभाग व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने संग्रामपूर तालुक्यातील खिरोडा गावाजवळ पूर्णा नदी पुल परिसरात सापळा रचला. दरम्यान सायंकाळी ४ . २० वाजेच्या दरम्यान वरवटकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची ईको कार (क्रमांक एमएच ३०, बी डब्ल्यू ९५८५ ) संशयित रित्या आढळून आली. सदर वाहनाला अडवून वाहनातील चौघांची चौकशी केली असता, प्रारंभी त्यांनी उडवाउडवीची उत्तरे िदली. पोलिसांनी सदर वाहनाची तपासणी केली असता यावेळी एक आरोपी पथकाला चकवा देवून फरार झाला. त्यांनतर वाहनाची झडती घेतली असता या वाहनात वाहनात मोठ्या प्रमाणात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा आढळून आला. वाहनातील पांढऱ्या पोत्यांमध्ये विविध कंपनींच्या नावाने विक्रीसाठी तयार करण्यात आलेली एकूण ४५८ बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली. यामध्ये DHOOM-२ या नावाची ९९ पाकिटे, IPL CHAMPION 5G ची १०० पाकिटे तसेच PINKG UARD ४ २०:२० नावाच्या “PINK RAKSHAK 5G” स्टिकरयुक्त तब्बल २५० पाकिटांचा समावेश आढळून आला.
जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांची अंदाजित किंमत सुमारे ४ लाख ५८ हजार रुपये असून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या ईको वाहनाची किंमत सुमारे ४ लाख रुपये असल्याने एकूण ८ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी रविकिरण नावकार (कृषी अधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन तामगाव पोलीस स्टेशनला आरोपी गुलाबराव मुरलीधर ठाकरे (रा. सांगोळा, ता. पातूर), शंकर उत्तम दांदळे (रा. सांगोळा, ता. पातूर) व विनोद हरिसास वाघमारे (रा. शिरला अंधारे, ता. पातूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील विनोद वाघमारे हा आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
संशयास्पद बियाण्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता
तपासादरम्यान जप्त करण्यात आलेल्या अनेक बियाण्यांच्या पाकिटांवर उत्पादकाचे नाव, वितरकाचा तपशील, लॉट क्रमांक, शासन मान्यता क्रमांक आणि वैधता दिनांक नमूद नसल्याचे समोर आले. काही पाकिटांवर बनावट स्टिकर चिकटवून बियाण्यांची विक्री केली जात असल्याचा संशय कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या बनावट बियाण्यांची शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही फिर्यादीत करण्यात आला आहे.
संयुक्त पथकाची नियोजनबद्ध कारवाई
या कारवाईत तामगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच कृषी विभागातील विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. यात कृषी विकास अधिकारी, जि.प. बुलढाणाचे पुरुषोत्तम अंगाईत , मोहीम अधिकारी, जि.प. यवतमाळ प्रमोद गायके,जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, बुलढाणा गणेश सावंत, कृषी अधिकारी, पंचायत समिती संग्रामपूर रविकिरण नावकार, कृषी अधिकारी – गुणनियंत्रण, संग्रामपूर रोहिणी बोढे , कृषी अधिकारी – गुणनियंत्रण, जळगाव जामोद अजिंक्य भटकर , कृषी अधिकारी – गुणनियंत्रण, शेगाव जानू पवार , सहायक कृषी अधिकारी, संग्रामपूर रवींद्र जाधव, तसेच धनंजय देवकर कनिष्ठ लिपिक, कृषी विभाग यांचा समावेश होता.
000




