संकटसमयी धावून आले ‘संजुभाऊ’; जखमी शिवसैनिकांसाठी बनले आधारवड
पाच लाखाची केली आर्थिक मदत

बुलढाणा
राजकीय क्षेत्रात कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहण्याच्या अनेक घोषणा केल्या जातात; मात्र प्रत्यक्ष संकटाच्या वेळी घटनास्थळी पोहोचून मदतीचा हात देणारे नेतृत्व मोजकेच असते. शिवसेना नेते तथा बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार धर्मवीर संजुभाऊ गायकवाड यांनी रविवारी अशीच संवेदनशीलता दाखवत जखमी शिवसैनिकांना मोठा दिलासा देत पाच लाख रुपयाची आर्थिक मदत ही प्रदान केली. ही घटना नुकतेच घडली.
मोताळा तालुक्यातील विकासकामांच्या कार्यक्रमानंतर काही शिवसैनिक आणि युवासैनिक बोलेरो वाहनातून बुलढाण्याकडे येत होते. थड फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला भरधाव टिप्परने धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या धडकेत बोलेरोचे मोठे नुकसान झाले, तर वाहनातील पाच जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी आपला ताफा थांबवत तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी स्वतः जखमी कार्यकर्त्यांची विचारपूस केली तसेच स्थानिकांच्या मदतीने त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यास मदत केली. त्यानंतर तातडीने वैद्यकीय मदतीची व्यवस्था करून सर्व जखमींना बुलढाणा येथील बोथरा क्रिटिकल केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. रुग्णालयातही आमदार गायकवाड यांनी डॉक्टरांशी चर्चा करून उपचारांची माहिती घेतली. जखमींवर योग्य उपचार व्हावेत यासाठी त्यांनी विशेष लक्ष दिले. या अपघातात शिवसेना विभाग प्रमुख प्रकाश पांडे, युवासेना उपजिल्हाप्रमुख प्रवीण निमकर्डे, भागवत होनाळे, सचिन हिरोळे आणि गणेश राजस हे जखमी झाले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, जखमी कार्यकर्त्यांच्या उपचाराचा पूर्ण खर्च स्वतः उचलण्याची जबाबदारी आमदार गायकवाड यांनी स्वीकारली. याशिवाय अपघातग्रस्त वाहनाचे नुकसान आणि कार्यकर्त्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी पाच लाख रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली. भविष्यातही कोणतीही गरज भासल्यास आपण कार्यकर्त्यांच्या पाठीशी कायम उभे राहू, असे आश्वासन त्यांनी दिले.
या संपूर्ण घटनेमुळे जखमी कार्यकर्ते आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा मानसिक आधार मिळाला. “संजुभाऊ यांनी केवळ नेता म्हणून नव्हे, तर कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे साथ दिली,” अशी भावना अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
कार्यकर्त्यांच्या अडचणींमध्ये सहभागी होणे आणि संकटाच्या क्षणी तत्परतेने मदतीला धावून जाणे, हीच आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वशैलीची ओळख मानली जाते. थड फाट्याजवळील या घटनेतून त्यांची कार्यकर्त्यांप्रती असलेली आत्मीयता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.




