शिवानी प्रकरण : आता पोलीस यंत्रणाचा अडचणीत
पीएसआयसह चार कर्मचाऱ्यांचे निलंब

जळगाव जामोद,
तालुक्यातील राजुरा शिवारात सापडलेल्या शिरविरहित मृतदेहाच्या गाजलेल्या प्रकरणाने आता पोलिस यंत्रणेलाच अडचणीत आणले आहे. कथित हत्येचा उलगडा केल्याचा दावा करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासावर गंभीर प्रश्न उपस्थित झाल्यानंतर एका पोलिस उपनिरीक्षकासह चार कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती २ जून रोजी समोर आली आहे.
राजुरा परिसरात आढळलेल्या शिरविरहित मृतदेहाचा संबंध बेपत्ता असलेल्या शिवानी काळमेकर हिच्याशी जोडत तपासाची दिशा ठरविण्यात आली होती. त्यानंतर तिची हत्या झाल्याचा निष्कर्ष काढत वडील बापूराव काळमेकर आणि भाऊ अजय काळमेकर यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी या कारवाईचा मोठा गाजावाजा करत प्रकरण उघडकीस आणल्याचा दावा केला होता. मात्र काही दिवसांनी शिवानी स्वतः जिवंत अवस्थेत समोर आल्याने संपूर्ण तपासाची विश्वासार्हता कोसळली.
या घडामोडीनंतर वरिष्ठ स्तरावर तपासाची फेरछाननी करण्यात आली. त्यात मृतदेहाची ओळख पटविण्याच्या प्रक्रियेत झालेल्या त्रुटी, पुराव्यांच्या पडताळणीत झालेली घाई आणि तपासातील निष्काळजीपणाचे मुद्दे समोर आल्याची चर्चा आहे. यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची प्रथम नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आणि नंतर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे समजते.
तांत्रिक पुरावे दुय्यम ठरल्याची चर्चा
या प्रकरणात वैज्ञानिक व तांत्रिक तपासाची अंतिम खातरजमा होण्यापूर्वीच निष्कर्ष काढण्यात आल्याची चर्चा पोलिस वर्तुळात आहे. परिणामी निर्दोष व्यक्तींना आरोपी ठरवून अटक करण्यात आल्याने पोलिसांच्या तपास पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मूळ प्रश्न अजूनही अनुत्तरित
शिवानी काळमेकर जिवंत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजुरा शिवारात सापडलेला शिरविरहित मृतदेह नेमका कोणाचा होता, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न अद्यापही कायम आहे. तपासातील त्रुटींमुळे कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असली, तरी या प्रकरणातील जबाबदारीची साखळी नेमकी कुठपर्यंत पोहोचते, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
—
घडामोडी एका नजरेत
▪ शिरविरहित मृतदेह प्रकरणाचा उलगडा झाल्याचा दावा
▪ शिवानी काळमेकरच्या कथित हत्येप्रकरणी पितापुत्रांना अटक
▪ शिवानी जिवंत आढळल्यानंतर तपासावर प्रश्नचिन्ह
▪ पीएसआयसह चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन
▪ मृतदेहाची ओळख अद्यापही गूढच
चर्चेचा केंद्रबिंदू
ज्या प्रकरणात कथित मृत व्यक्तीच जिवंत समोर आली, त्या तपासातील निर्णय, पर्यवेक्षण आणि जबाबदारीची खरी साखळी कोणती? याचे उत्तर शोधण्याची वेळ आता पोलिस प्रशासनावर आली आहे.




