बुलडाण्यात पावसाचा ‘महाप्रहार’; ९२ पैकी ९१ मंडळांत अतिवृष्टी!

जळगाव जामोदला सर्वाधिक २०७.४ मिमी; , पिकांसह नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

बुलडाणा

जिल्ह्यात गुरुवार रात्रीपासून पावसाने अक्षरशः रौद्ररूप धारण केले. अवघ्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १२५.९ मिमी पाऊस कोसळला असून, ९२ महसूल मंडळांपैकी तब्बल ९१ मंडळांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. केवळ देऊळगाव राजा तालुक्यातील अंढेरा मंडळात ४१.८ मिमी पाऊस झाला. उर्वरित सर्व मंडळांनी ६५ मिमीचा अतिवृष्टीचा निकष ओलांडला आहे. मंडळनिहाय अहवालावरून ही अभूतपूर्व स्थिती समोर आली आहे.
जळगाव जामोद तालुक्याला पावसाचा सर्वाधिक तडाखा बसला. तालुक्यात सरासरी २०७.४ मिमी पावसाची नोंद झाली. जळगाव, जामोद आणि आसलगाव मंडळांत प्रत्येकी २५५ मिमी, तर पिंपळगाव काळे मंडळात १५४.३ आणि वडशिंगी येथे ११७.८ मिमी पाऊस झाला. नांदुरा तालुक्यात सरासरी १७४.८ मिमी, खामगावमध्ये १५२.९ मिमी, शेगावमध्ये १३९.७ मिमी, मलकापूरमध्ये १३१.२ मिमी, तर संग्रामपूरमध्ये ११७.८ मिमी पावसाची नोंद झाली. खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा, काळेगाव आणि पारखेड मंडळांत प्रत्येकी २१२.८ मिमी, शेगाव तालुक्यातील जळंबमध्ये २००.५ मिमी, नांदुरा तालुक्यातील निमगावमध्ये २१९.८ मिमी, तर वडनेर आणि महाळुंगी मंडळांत प्रत्येकी २०० मिमी पाऊस झाला. चिखलीतील पेठ मंडळातही १९५ मिमी पावसाची नोंद झाली.

असा आहे तालुकानिहाय पावसाचा जोर
बुलडाणा १०४.८, चिखली १०९.८, देऊळगाव राजा ८२.५, सिंदखेड राजा ९८.१, लोणार १००, मेहकर १११, मोताळा १०६.७, संग्रामपूर ११७.८, मलकापूर १३१.२, शेगाव १३९.७, खामगाव १५२.९, नांदुरा १७४.८ आणि जळगाव जामोद तालुक्यात २०७.४ मिमी पाऊस झाला. हंगामात आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी ३८५.७ मिमी, म्हणजे वार्षिक सरासरीच्या ५०.६४ टक्के पाऊस पडला आहे. जळगाव जामोद तालुका ५०८.६ मिमीसह आघाडीवर, तर देऊळगाव राजा ३२४.८ मिमीसह तळाशी आहे.

धरणांत मात्र केवळ ३२ टक्के साठा
अतिवृष्टी होऊनही जिल्ह्यातील प्रकल्पांतील एकूण उपयुक्त जलसाठा अवघा ३२.०१ टक्के आहे. तीन मोठ्या प्रकल्पांत ३२.१२, सात मध्यम प्रकल्पांत ४६.४२, तर ४१ लघुप्रकल्पांत केवळ १२.८५ टक्के साठा आहे. खडकपूर्णा प्रकल्पात अद्याप उपयुक्त पाणीसाठा शून्य असून, केवळ मृतसाठा शिल्लक आहे. बुलढाणा शहरात भारतीय हवामान विभागाने गेल्या २४ तासांत १२८ मिमी पावसाची अधिकृत नोंद केली आहे. शुक्रवारीही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नदी-नाल्यांच्या काठावरील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

ठळक आकडे
९२ — जिल्ह्यातील एकूण महसूल मंडळे
९१ — अतिवृष्टी झालेली मंडळे
२५५ मिमी — सर्वाधिक मंडळनिहाय पाऊस
१२५.९ मिमी — जिल्ह्याची २४ तासांतील सरासरी
३२.०१ टक्के — प्रकल्पांतील एकूण उपयुक्त जलसाठा

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!