इकबाल नगर, मिर्झा नगरच्या नागरिकांचा नगर परिषदेत धडक मोर्चा; आठ दिवसांत कामे न झाल्यास आंदोलनाचा इशारा

निवडणुकीतील आश्वासने हवेतच; मुस्लिमबहुल परिसर विकासापासून वंचित

बुलढाणा

 निवडणुकीच्या काळात दिलेली विकासकामांची आश्वासने प्रत्यक्षात उतरली नसल्याचा आरोप करत बुलढाणा नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मधील इकबाल नगर आणि मिर्झा नगर परिसरातील नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला. रस्ते, नळपाणी, नाल्या आणि स्वच्छतेच्या प्रश्नांकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती आणि युवकांनी गुरुवारी नगर परिषद कार्यालयावर धडक देत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

या भागात गेल्या तीन-चार वर्षांपासून नवीन नळपाणी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र, काम अद्याप पूर्ण झाले नसून ठेकेदाराने रस्त्यांवर मोठमोठे खड्डे खोदून ते अर्धवट अवस्थेत सोडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहे. त्यामुळे रस्ता आणि खड्डा यातील फरकही लक्षात येत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

प्रभागात हाजी उस्मान डोंगरे उर्दू शाळा, मौलाना आझाद शाळा, गुलशने इब्राहीम शाळेसह विविध शैक्षणिक संस्था आहेत. तसेच सहकार विद्या मंदिर, सेंट जोसेफ आणि केम्ब्रिज स्कूलच्या बसेसही याच मार्गावरून ये-जा करतात. त्यामुळे खराब रस्ते आणि पाण्याने भरलेल्या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, अपघाताची शक्यताही वाढली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

नाल्यांची सफाई, कचरा उचलण्याकडेही दुर्लक्ष

रस्त्यांची दुरवस्था आणि तुंबलेल्या नाल्यांमुळे परिसरात अस्वच्छतेचे प्रमाण वाढले आहे. नाल्यांची सफाई केल्यानंतर त्यातील कचरा आठ-आठ दिवस उचलला जात नसल्याने दुर्गंधी आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. नियमित घरपट्टी, पाणीपट्टी व इतर कर भरूनही अपेक्षित नागरी सुविधा मिळत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.

अल्पसंख्याकबहुल प्रभागाच्या विकासासाठी उपलब्ध होणारा विशेष निधी या भागाच्या विकासासाठी अपेक्षित प्रमाणात वापरला जात नसल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. विकासाच्या बाबतीत भेदभाव होत असल्याचा दावा करत नागरिकांनी प्रशासनाने तातडीने या प्रश्नांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली.

कर न भरण्याचा इशारा

परिसरातील मूलभूत नागरी सुविधा पूर्ववत होईपर्यंत नगर परिषदेला कर न भरण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. रस्त्यांची दुरुस्ती, खड्डे बुजविणे, नळपाणी पाइपलाइनचे रखडलेले काम पूर्ण करणे तसेच नाल्या व परिसराची नियमित स्वच्छता या मागण्यांवर पुढील आठ दिवसांत ठोस कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर शेख बशीर शेख कालु, ॲड. शकील शेख, लतीफ शाह भिकन शाह, अब्दुल गफ्फार शेख, शेख अकबर शेख मिया, हाफिज शेख मुजीबुरहेमान, शेख रशीद शेख कालु, मोहम्मद शाकीर, एफ. एम. काजी, वाय. पी. सैयद, जावेद खान, गुफरान, शेख गुलाम दस्तगीर, वसीम शेख (पत्रकार) यांच्यासह अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

संपादक

सोनाली पानट, पानट गल्ली मलकापूर आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा 9822572589 / 9767932688 politicslivenews@gmail.com राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!