लोणार सरोवर आणि धार तीर्थ पर्यटकांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू करा!
राजेश मापारी यांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

लोणार
जागतिक कीर्तीचे लोणार सरोवर आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेले धार तीर्थ पर्यटक व भाविकांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी राजेश मापारी यांच्या नेतृत्वाखालील लोणारच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन सादर केले. या दोन्ही महत्त्वाच्या स्थळांवरील निर्बंध दूर करून पर्यटन आणि धार्मिक स्थळांचा विकास साधावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
लोणार सरोवर हे जगातील महत्त्वाच्या नैसर्गिक आश्चर्यांपैकी एक असून, देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. त्याचप्रमाणे धार तीर्थाला धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या विशेष महत्त्व आहे. मात्र, या स्थळांचा पर्यटकांना पूर्ण क्षमतेने लाभ घेता यावा, यासाठी आवश्यक कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे शिष्टमंडळाने निवेदनातून निदर्शनास आणून दिले.
पर्यटनाला चालना, स्थानिकांना रोजगाराची संधी
लोणार सरोवर आणि धार तीर्थ पर्यटकांसाठी पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास शहरातील पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळू शकते. हॉटेल व्यावसायिक, ट्रॅव्हल्स चालक, पर्यटक मार्गदर्शक तसेच अन्य लहान-मोठ्या व्यावसायिकांना त्याचा लाभ होईल. पर्यटकांची संख्या वाढल्यास स्थानिक बाजारपेठेत आर्थिक उलाढाल वाढून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होण्यास मदत होईल, अशी भूमिका शिष्टमंडळाने मांडली.
या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वैयक्तिक लक्ष घालावे आणि संबंधित विभागांशी समन्वय साधून आवश्यक ती कार्यवाही तातडीने करावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. लोणारच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.
या मोहिमेचे नेतृत्व राजेश मापारी यांनी केले. यावेळी लोणार शहरातील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी विजय तोष्णीवाल, संकेत तोष्णीवाल, मंगेश शेटे सर, श्रीनिवास मुंदडा आणि पंकज सुपट्यांन उपस्थित होते.



