बारावीच्या परीक्षेला बैठे पथक मिळेना; कृषी सहायक संघटना झाली आक्रमक
आज होणार इंग्रजीचा पेपर, ३५ हजार २११ विद्यार्थी येणार परीक्षेला

बुलडाणा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सुरू होणाऱ्या बारावीच्या परीक्षेवर यंदा विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या नाराजीचे सावट निर्माण झाले आहे. आधीच परीक्षेवर तलाठी व ग्रामसेवक संघटनेच्यावतीने कामावर नाराजी व्यक्त केली असताना, आता कृषी सहायक संघटना आक्रमक झाली असून संघटनेने परीक्षा कामावर बहिष्कार टाकल्यामुळे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
बारावीच्या परीक्षेची सुरुवात १० फेब्रुवारी पासून इंग्रजी विषयाच्या पेपरने होत आहे. बुलडाणा जिल्ह्यात या परीक्षेसाठी तब्बल ३५ हजार २११ विद्यार्थीनी नोंदणी केली आहे. परीक्षेसाठी प्रशासनाच्यावतीने जोरदार तयारी केली जात आहे. बारावीची परीक्षा पूर्णतः कॉपीमुक्त व पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यंदा विशेष खबरदारी घेतली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालक, पर्यवेक्षक यांच्यासह बसते पथक व फिरते पथक नेमण्यात आले आहे. संवेदनशील केंद्रांवर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त, सीसीटीव्ही कॅमेरे आणि अचानक तपासणीची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षा सुरू असताना बाहेरील व्यक्तींना केंद्र परिसरात प्रवेशबंदी लागू करण्यात आली असून, गैरप्रकार आढळल्यास तात्काळ कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत. मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साधने यांवर कडक लक्ष ठेवण्याचे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले आहे. मात्र, परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाच्या प्रश्नामुळे परीक्षा व्यवस्थेवर ताण येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी आणि पारदर्शकता राखण्यासाठी बसते पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, या पथकांवर अतिरिक्त जबाबदाऱ्या असल्याने सदर पथकासाठी नियुक्त करण्यात येत असलेल्या कर्मचाऱ्यात तीव्र नाराजीचे वातावरण आहे. यापूर्वी तलाठी व ग्रामसेवक संघटनेच्यावतीने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. त्या पाठोपाठ १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या या परीक्षेसाठी कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ९ फेब्रुवारी परीक्षेच्या नियुक्तीवरच बहिष्कार टाकला आहे.
यामुळे परीक्षा केंद्रांवरील व्यवस्थापन, देखरेख आणि समन्वयाच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
अशी आहे विद्यार्थी संख्या
जिल्ह्यातील ३५ हजार २११ विद्यार्थी ही परीक्षा देणार.
परीक्षा केंद्र
परीक्षेसाठी ११७ केंद्र
भरारी पथकांची माहिती गुलदस्त्यात
जिल्हयात यंदा बारावीच्या परीक्षेसाठी एकूण ८ भरारी पथके तैनात करण्यात आली आहे. ही पथके जिल्हाधिकारी कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत राहणार आहेत. तसेच जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर आणि १६ परिरक्षक केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. तलाठी पाठोपाठ ग्रामसेवक व त्या पाठोपाठ कृषी कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकल्याने आता या बैठे पथकात नेमका कोणाचा समावेश करण्यात आला आहे, याची माहिती सदर विभागाकडून मिळू शकली नाही.
कृषी कर्मचाऱ्यांची नाराजी
बैठे पथकात यंदा कृषी विभागात फिल्डवर असलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती देण्यात आली आहे. सदर आदेश शुक्रवारी दुपारी सदर कर्मचाऱ्यांना मिळाले. शनिवार व रविवार सुटटी असल्याने कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी हा निषेध नोंदवला आहे. त्यांनी आरोप केला आहे की, नियुक्तीच्या गावी कर्मचाऱ्यांचा समावेश बैठे पथकात करण्यात आला नाही, त्यांना ८० किमी दुर असलेल्या परीक्षेतील पथकात समावेश करण्यात आला आहे. ही परीक्षा १८ मार्च पर्यत घेतली जाणार आहे, तर दुसरीकडे परीक्षेची कामे करुन मार्च एन्डची कामे संपवावी लागणार आहे, त्यामुळे ही कामे शक्य नसल्याचा दावा कृषी कर्मचाऱ्यांनी केला आहे.
कर्मचाऱ्यावर दबाव टाकला जातो आहे
बैठे पथकाचे काम कर्मचाऱ्यांनी केले ही असते, परंतू ही नियुक्ती त्याच गावात नाही. तसेच ही कामे करुन कार्यालयातील कामे करण्याचे आदेश आहे. मार्च एन्डची जवाबदातून देखील आमची सुटका नाही. हे काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांवर दबाव टाकला जातो आहे, हा कर्मचाऱ्यावरील अन्याय आहे.
विलास रिंढे, अध्यक्ष
राज्य सहायक कृषी अधिकारी संघटना
कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कार्यवाही होण्याची शक्यता
परीक्षेच्या नेमकं तांेडावर कृषी कर्मचाऱ्यांनी हा बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे आता प्रशासनापुढे बैठे पथकाचा पेच तयार झाला आहे. शासनाच्या आदेशाची अमलबजावणी होत नसल्याने प्रशासनाकडून सदर कर्मचाऱ्यांवर शिस्त भंगाची कारवाई होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे.
कॉपी सापडल्यास केंद्राची परवानगी होणार रदद
परीक्षेदरम्यान कोणत्याही केंद्रावर विद्यार्थ्यांकडून कॉपी करताना आढळल्यास संबंधित केंद्रावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. प्राथमिक चौकशीनंतर त्या केंद्राची परीक्षा घेण्याची परवानगी रद्द करण्यात येईल, तसेच पुढील परीक्षांसाठी त्या केंद्राला वगळण्यात येणार आहे. याशिवाय केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांवरही शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. परीक्षेची विश्वासार्हता अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाकडून कठोर भूमिका घेण्यात येणार आहे.
अनील अकाल,
शिक्षणाधिकारी, माध्यमिक बुलडाणा




