गोरेगाव येथे कृषी विद्यार्थ्यांकडून पशुस्वच्छता व जनजागृती मोहीम

हिवरा आश्रम,
येथील विवेकानंद कृषी महाविद्यालय, हिवरा आश्रमच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव (RAWE) उपक्रमांतर्गत पशुसंवर्धन व गोठा स्वच्छतेबाबत विशेष जनजागृती मोहीम राबविली. या उपक्रमाद्वारे गावातील पशुपालकांना आधुनिक व शास्त्रीय पशुपालनाच्या पद्धतींचे मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रम नुकतेच पार पडला.
यावेळी विद्यार्थ्यांनी गावातील विविध गोठ्यांना भेट देत जनावरांची स्वच्छता, अंगाची निगा, तसेच गोठ्यांतील स्वच्छतेचे महत्त्व प्रत्यक्ष प्रात्यक्षिकातून स्पष्ट केले. गायी व म्हशींची स्वच्छता केल्यास त्यांच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, दूध उत्पादन वाढते आणि विविध आजारांपासून संरक्षण मिळते, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या मोहिमेदरम्यान पशुपालकांना गोठ्यातील स्वच्छ वातावरण, नियमित देखभाल आणि संतुलित पशुपालन पद्धतींचे फायदे समजावून सांगण्यात आले. संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठ्यांची नियमित साफसफाई आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून एम. व्ही. खोडके व एस. डी. जाधव यांनी विद्यार्थ्यांना दिशा दिली. विषय शिक्षक एम. एच. कडू यांनी पशुसंवर्धन व्यवस्थापन, जनावरांची निगा आणि गोठा व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. सुभाष कालवे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील प्रत्यक्ष पशुपालन पद्धतींचा अनुभव मिळाला. तसेच पशुपालकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजनांची माहिती देण्याची संधी विद्यार्थ्यांना प्राप्त झाली.
उपक्रमात श्याम बोडखे, गणेश भुसारी, करण शिंदे, लखन चांडक आणि चेतन बुरंगे या विद्यार्थ्यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.



