केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर ; तातडीने पंचनाम्यांचे प्रशासनाला निर्देश

बुलडाणा
जिल्ह्यात ३० व ३१ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील गावांची पाहणी केंद्रीय आयुष व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी शनिवार १ ऑगस्ट रोजी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली. यावेळी पिकांचे तसेच घरांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले.
अतिवृष्टी मुळे जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनजीवनही विस्कळीत झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रतापराव जाधव यांनी चावरा, इलोरा, मडाखेड खुर्द, मडाखेड बुद्रुक, काजेगाव, बोराळा बुद्रुक, बोराळा खुर्द, खेर्डा खुर्द, खेर्डा बुद्रुक, चांगेफळ, रुधाणा आणि वकाणा या गावांतील नुकसानग्रस्त भागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. आलेल्या संकटाचा धैर्याने सामना करा, शासन तुमच्या पाठीशी ठामपणे उभे आहे,” अशी ग्वाही त्यांनी शेतकऱ्यांना दिली.
पाहणीदरम्यान तहसीलदार पवन पाटील, कृषी अधिकारी रमेश वाघ, गटशिक्षणाधिकारी ऐश्वर्या कोरे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. तसेच शिवसेना सहसंपर्कप्रमुख शांताराम दाणे, जिल्हाप्रमुख संतोष डिवरे, उपजिल्हाप्रमुख देविदास घोपे, भाजप नेते गजानन सरोदे, बंडू पाटील, युवासेना लोकसभा अध्यक्ष चेतन घिवे, तालुकाप्रमुख केशव ढोकणे, कैलास कडाळे, राष्ट्रवादीचे चेतन देशमुख, रंगराव देशमुख, मोहन ठाकरे यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.




