तीन दिवसांपासून सुरू असलेल्या गजानन घोंगडे यांच्या उपोषणाची सांगता
स्मशानभूमी, गोरनाळा व पिंपळगाव देवी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांची एकजूट

धामणगाव बढे
धामणगाव बढे येथील स्मशानभूमी, गोरनाळा तसेच पिंपळगाव देवी रस्त्याच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करण्यात यावीत, या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते गजानन घोंगडे यांनी सुरू केलेल्या तीन दिवसीय उपोषणाची अखेर २८ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता सांगता झाली. चिमुकली ओवी बोर्डे हिच्या हस्ते ज्यूस घेऊन गजानन घोंगडे यांनी आपले उपोषण सोडले.
यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे, माजी उपसरपंच बिस्मिल्ला कुरेशी, वसंता घोंगडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.दरम्यान, गजानन घोंगडे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी २७ ऑगस्ट रोजी ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले होते. रस्त्यांची दुरवस्था दूर करून संबंधित कामे तातडीने सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. ग्रामस्थांच्या वाढत्या पाठिंब्यामुळे आंदोलनाला अधिक बळ मिळाले.
गजानन घोंगडे यांचे उपोषण सोडविण्यासाठी माजी आमदार विजयराज शिंदे यांनी मध्यस्थी केली. त्यांनी संबंधित कंत्राटदार तसेच उपोषणस्थळी उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. या चर्चेनंतर झालेल्या सकारात्मक हालचालींच्या पार्श्वभूमीवर २८ ऑगस्ट रोजी गजानन घोंगडे यांनी आपले उपोषण मागे घेतले.
उपोषण सोडल्यानंतर गजानन घोंगडे यांनी, “हा विजय माझा नसून गावकऱ्यांच्या एकतेचा विजय आहे,” असे सांगितले. तसेच गावाच्या विकासासाठी पक्षभेद व धर्मभेद विसरून एकजुटीने पाठिंबा देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे त्यांनी आभार मानले.
या आंदोलनाच्या निमित्ताने धामणगाव बढे येथील ग्रामस्थांनी गावाच्या विकासाच्या प्रश्नावर एकजूट दाखवून दिली असून, आता संबंधित रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे प्रत्यक्षात कधी सुरू होतात, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.




