देशात सर्वात उष्ण जिल्हयात अकोला, वर्धा, अमरावती, यवतमाळ
पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा

प्रतिनिधी | नागपूर
राज्यातील उष्णतेचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून देशातील सर्वाधिक उष्ण जिल्ह्यांमध्ये अकोला, वर्धा, यवतमाळ सह अमरावती यांचा समावेश झाला आहे. तापमानात सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस या भागात उष्णतेची लाट (हीटवेव्ह) कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे दुपारच्या वेळेत विशेषतः बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे. सध्या विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा व यवतमाळ जिल्हयात ४३ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. अनेक भागांत तापमान ४२ ते ४५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान पोहोचले असून उष्ण व कोरडे वारे वाहत आहेत. परिणामी नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होत असून आरोग्यावरही परिणाम जाणवत आहे.
हवामान बदलाची तीव्रता जगासह देश व राज्यालाही बसत आहे. परिणामी राज्यभरातील नागरिकांना अस्थिर हवामानाचा सामना करावा लागत आहे. एप्रिलच्या प्रारंभी काही भागात वादळीवारे, गारपीट नोंदवण्यात आली. त्यामुळे कमाल व किमान तापमानाची नोंद ही झाली होती. मात्र मागील काही दिवसापासून तापमान वाढत असल्याने नागरिक त्रस्त आहे.
तज्ञांच्या मते, उष्माघाताचा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी पुरेसे पाणी पिणे, डोक्यावर संरक्षण ठेवणे, हलके व सैल कपडे वापरणे आणि शक्यतो दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळावे असे आवाहन हवामान विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


