संग्रामपूर तालुक्यात वाळू माफियांनी महसूल पथकाला गुंगारा देऊन ट्रॅक्टर पळवले; तामगाव पोलिसांत गुन्हा दाखल

 संग्रामपूर | प्रतिनिधी
  तालुक्यातील काकनवाडा ते तेल्हारा मार्गावर अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांच्या पथकासमोरून वाळूने भरलेले ट्रॅक्टर चालकाने पळवून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तामगाव पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आणि वाळू चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या आदेशान्वये अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाचे पथक गस्त घालत होते. २१ एप्रिल रोजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास काकनवाडा ते तेल्हारा रोडवरील काकनवडा येथील वान नदीच्या पुलाजवळ करमोडा येथील ग्राम महसूल अधिकारी श्रीकृष्ण विष्णू सानोने आणि देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे ग्राम महसूल अधिकारी एकलारा हे ड्युटीवर तैनात होते.  यावेळी त्यांना विना क्रमांकाचे लाल रंगाचे ‘महिंद्रा ५७५’ कंपनीचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह येताना दिसले. अधिकाऱ्यांनी ट्रॅक्टर थांबवून तपासणी केली असता, त्यामध्ये साधारण दीड ब्रास वाळू बाजारभाव किंमत ७,५०० रुपये विनापरवाना असल्याचे आढळले. पथकाने ट्रॅक्टर चालक हासम शाहा रा. माळेगाव, ता. तेल्हारा, जि. अकोला याला वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली. परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यावर महसूल अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती तहसीलदारांना दिली आणि घटनास्थळावर पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली. मात्र, याच दरम्यान संधी साधून चालक हासम शाहा याने ट्रॅक्टर आणि वाळूसह घटनास्थळावरून धूम ठोकली. महसूल अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केला, मात्र तो हाती लागला नाही.
      शासकीय कामात अडथळा आणून सरकारी मालकीची वाळू चोरून नेल्याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी श्रीकृष्ण सानोने यांनी तामगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून आरोपी हासम शाहा याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ च्या कलम ३०३(२), २२१ तसेच खाण आणि खनिज (नियमन आणि विकास) अधिनियम, १९५७ च्या कलम २१(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवादार संतोष गाडे या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, फरार आरोपी आणि ट्रॅक्टरचा शोध घेतला जात आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
 “२४ तासांचा विलंब नेमका का.?” तक्रारीवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तक्रार दाखल करण्यास झालेला विलंब. घटना 20 एप्रिल रोजी सकाळी ७ वा. घडलेली असताना, संबंधित तलाठी यांनी तक्रार मात्र दुसऱ्या दिवशी, म्हणजेच जवळपास ३६ तासांनंतर दाखल केली. घटनास्थळापासून तामगाव पोलीस ठाण्याचे अंदाजे अंतर अवघे 10 किलोमीटर असताना तक्रारीस इतका विलंब का झाला, याबाबत तालुक्यात चर्चा सुरू झाली आहे. तात्काळ कारवाई का झाली नाही, यावर प्रशासनाने स्पष्टीकरण देण्याची गरज व्यक्त होत आहे.
“कारवाई एकीकडे, तर दुसरीकडे बेधडक उत्खनन!”
संग्रामपूर तालुक्यात महसूल प्रशासन अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी सक्रिय असल्याचे चित्र दाखवले जात असले, तरी वास्तव मात्र वेगळेच आहे. तालुक्यातील सोनाळा महसूल मंडळा अंतर्गत ग्राम टुनकी येथील लेंडी नदीसह अनेक ठिकाणी शासकीय कामांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर विनापरवानगी उत्खनन सुरू असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, जेसीबी व पोकलेन च्या साह्याने हजारो ब्रास रेती व मुरूम काढले जात असून, या कामांवर कोणतीही ठोस नियंत्रण यंत्रणा दिसत नाही. अनेक ठिकाणी दिवसाढवळ्या वाहतूक सुरू असतानाही संबंधित तलाठी व मंडल अधिकारी यांचे कडून दुर्लक्ष होत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये आहे.
एकीकडे किरकोळ प्रकरणांवर कारवाई होत असताना मोठ्या प्रमाणावरील उत्खननाकडे दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित होत असून, यावर तहसीलदार प्रशांत पाटील यांनी कठोर भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे.

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!