काझींच्या तिकीट नकारावरून अजित पवार गटात खदखद; ९० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे ‘रेडी’
पालकमंत्र्यांसमाेरच समर्थकांची घाेषणाबाजी


बुलढाणा : विधान परिषदेसाठी नाव अंतिम होईल, या अपेक्षेने अनेक वर्षे प्रतीक्षा करणाऱ्या ॲड. नाझेर काझी यांना पुन्हा एकदा डावलण्यात आल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्ह्यात अस्वस्थता उफाळून आली आहे. जवळपास ९० पदाधिकारी सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत असल्याने स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली.
पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या दौऱ्यादरम्यानच ही नाराजी उघडपणे समोर आली. विश्रामगृहाबाहेर कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रोष व्यक्त केला, तर दुसरीकडे नियोजित बैठकही रद्द करावी लागली. पक्षांतर्गत चर्चांपेक्षा रस्त्यावर उतरण्याचा पर्याय निवडल्याने परिस्थितीची तीव्रता अधोरेखित झाली.
सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत असलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये मनिष बोरकर, शेखर बोंद्रे, तुषार बोंद्रे, संतोष लोखंडे, मनोज दांडगे, महेश देवरे, सुजीत देशमुख, उमेश खरात, प्रदीप वाघ, सागर मेहेत्रे, भुषण दाभाडे, अनिल बावस्कर यांच्यासह मोठा गट सक्रिय असल्याचे समजते.
दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री मकरंद पाटील यांनी “हा अंतर्गत विषय असून नाराजी लवकरच निवळवली जाईल,” असे सांगितले. सूत्रांच्या माहितीनुसार, पदांचे राजीनामे देण्याची तयारी असली तरी प्राथमिक सदस्यत्व कायम ठेवण्याची भूमिका घेतली गेली आहे.
विश्रामगृहावर उशिरापर्यंत सुरू असलेल्या चर्चांमधून तोडगा निघणार का, की हा नाराजीचा उद्रेक आणखी वाढणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.