ऑन-द-स्पॉट निपटाऱ्यासाठी केंद्रीय मंत्री जाधवांचा जनता दरबार
सिंदखेडराजात १८ जुलैला जनता दरबार; नागरिकांच्या तक्रारींवर होणार थेट सुनावणी

बुलडाणा
सर्वसामान्य नागरिकांच्या विविध शासकीय तक्रारी व प्रलंबित प्रश्नांना जलद गतीने मार्गी लावण्यासाठी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणाचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत १८ जुलै रोजी सिंदखेडराजा येथे जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांकडून विविध प्रकारच्या शासकीय तक्रारी व समस्या सातत्याने प्राप्त होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विधानसभा मतदारसंघनिहाय जनता दरबार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मालिकेचा प्रारंभ राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमी असलेल्या सिंदखेडराजा येथून होणार आहे.
पहिला जनता दरबार १८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता सिंदखेडराजा येथील मातोश्री मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला आहे. या दरबारात सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या महसूल, आरोग्य, पाणीपुरवठा, वीज, सामाजिक न्याय, पंचायत राज तसेच इतर शासकीय विभागांशी संबंधित तक्रारींची सुनावणी करून त्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
या जनता दरबारात तक्रारींचा समावेश व्हावा यासाठी नागरिकांनी आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात १७ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत संबंधित तहसील कार्यालयात सादर कराव्यात, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी सिंदखेडराजा व देऊळगाव राजा तहसील कार्यालयात विशेष जनता दरबार तक्रार कक्ष सुरू करण्यात आले आहेत.
सिंदखेडराजा तहसील कार्यालयात ज्योती बारवाल (मो. ७२७६०९३२६९) व मनोज देशमुख (मो. ९८२३१९७००१) यांच्याकडे, तर देऊळगाव राजा तहसील कार्यालयात सहाय्यक महसूल अधिकारी दीपक मोरे (मो. ९८५०८१४०३८) आणि बालाजी कौशल्य (मो. ९७६४६१९४२०) यांच्याकडे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, १७ जुलैपर्यंत प्राप्त झालेल्या तक्रारींचाच १८ जुलै रोजी होणाऱ्या जनता दरबारात विचार केला जाणार आहे. त्यामुळे संबंधित नागरिकांनी मुदतीपूर्वी आपले अर्ज विशेष तक्रार कक्षात जमा करून या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




