अभ्यास समितीचे काम तत्काळ सुरू करा – गोर सेनेची मागणी

सिंदखेडराजा,
बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गात समावेश करण्यासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या अभ्यास समितीचे काम तत्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी गोर सेनेने केली आहे.
या संदर्भात पदाधिकाऱ्यांनी आज, दि. ७ मे रोजी नायब तहसीलदार प्रांजल पवार यांना निवेदन दिले. बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात आरक्षणासाठी लाखो समाजबांधव मुंबई येथे आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर राज्य शासनाने दखल घेत उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली होती. मात्र, समिती स्थापन होऊन पाच महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही, असा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आला आहे. समितीने अद्याप कोणताही अभ्यास अहवाल बंजारा समाजासमोर मांडला नसल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सात दिवसांच्या आत समितीचे काम सुरू करून बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गातील समावेशाबाबत योग्य अभ्यास व संशोधन करावे, अन्यथा तीव्र जनआंदोलन करण्यात येईल, असा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
निवेदन देताना बंजारा आरक्षण समितीचे सदस्य रोहिदास राठोड, गोर सेनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय राठोड, सरचिटणीस रमेश राठोड, कार्यकारी जिल्हाध्यक्ष विलास राठोड, तालुकाध्यक्ष भोलू महाराज, पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव, लक्ष्मण राठोड, नशिराबादचे सरपंच पवार, विठ्ठल पवार, संतोष आडे, कृष्णा आडे आदी उपस्थित होते.



