कॉकरोच जनता पार्टीचे ७० तासात ७२ हजार सदस्य नोंदणी
सोशल मिडीयावर युवाशक्तीचा प्रचंड गदारोळ

पुणे | मनीष अग्रवाल
कॉकरोच जनता पार्टी या नव्या संघटनेने सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ उडवली आहे. अवघ्या ७० तासांत ७२ हजार सदस्य नोंदणी झाल्याचा दावा पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे. युवकांमध्ये या पक्षाबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
पक्षाच्या नावामुळे सुरुवातीला अनेकांनी हा उपक्रम विनोदी किंवा सोशल मीडिया मोहिमेचा भाग समजला होता. मात्र, युवाशक्तीचा वाढता प्रतिसाद आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरू असलेली सदस्य नोंदणी मोहीम यामुळे या संघटनेची चर्चा राज्यभर पसरू लागली आहे. विशेषतः बेरोजगारी, शिक्षण, स्थानिक प्रश्न आणि राजकीय व्यवस्थेतील बदल या मुद्द्यांवर पक्षाने युवकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. इंस्टाग्राम, फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसारख्या माध्यमांवर या मोहिमेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर विविध व्हिडिओ, पोस्टर आणि प्रचार संदेश प्रसारित केले जात असून, त्यातून युवकांना जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक ठिकाणी युवकांनी स्वयंस्फूर्तीने ऑनलाइन सदस्य नोंदणी मोहिमेत सहभाग घेतल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे या पार्टीत सामील होण्याची पात्रता देखील खूपच हटके आणि खास आहे. यासाठी तुम्ही बेरोजगार आणि आळशी असणे आवश्यक आहे. जर तुम्ही दिवसातून कमीत कमी ११ तास ऑनलाईन राहत असाल, तर हा पक्ष तुम्हाला आपला सदस्य बनवून घेत आहे.
तरुणांची राजकिय आघाडी कॉकरोच जनता पार्टी
सदर पार्टी ही केवळ व्यंग म्हणून उदयास आली जरी असेल, मात्र आता या संघटनेने वेगळेच रुप धरले आहे. ही तरुणांची एक राजकीय आघाडी म्हणून उदयास येत आहे. ‘तरुणांसाठी आणि तरुणांद्वारे’ या विचारसरणीवर हे हँडल काम करत आहे.
असे आले संघटना उदयास
काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणीदरम्यान बेरोजगार तरुणांबाबत एक विधान केले होते. ज्यामध्ये त्यांनी कथितरीत्या बेरोजगार तरुण, पत्रकारिता, आरटीआय ॲक्टिव्हिझम आणि वकिली यांसारख्या क्षेत्रांत येणाऱ्या लोकांची तुलना “कॉकरोच” आणि परजीवी यांच्याशी केल्याची बाब व्हायरल झाली होती. ही टिप्पणी सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाली आणि अनेक लोकांनी याला विरोधही केला. यावर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी आपल्या वादग्रस्त ‘कॉकरोच’ आणि ‘परजीवी’ विधानावर स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, त्यांच्या विधानाचा मीडियाच्या एका घटकाने चुकीचा अर्थ काढला आहे. त्यांचे लक्ष्य देशातील तरुण किंवा बेरोजगार नसून, ‘बनावट पदवी धारक’ होते. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर प्रचंड गदारोळ माजला होता. याच शब्दाचा तरुणांनी व्यंगाचे हत्यार म्हणून वापर केला आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’ हे नाव समोर आले. पाहता पाहता हे नाव इंटरनेटवर ट्रेंड करू लागले.



