निकृष्ट कामाचा कळस; दुसऱ्या दिवशी रस्ता उखडला!

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या डोळ्यांदेखत लाखोंच्या निधीची लूट

 

 

प्रतिनिधी | संग्रामपूर
रविवार २४ मे रोजी गावात करण्यात आलेल्या रस्त्यावरील डामरीकरण सोमवार २५ मे रोजी सकाळी उखडल्या गेले. या निकृष्ठ कामाच्या कळसामुळे कोद्री – कुंदेगाव ग्रामस्थांनी प्रचंड संताप व्यक्त केला. विकास कामाच्या नावाखाली कोटयावधीचा भ्रष्टाचार बांधकाम विभागाच्या डोळया समोर होत असल्याने सदर विभागाने कंत्राटदारावर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांच्यावतीने केली जात आहे.
वर्षानुवर्षे खड्ड्यांच्या त्रासाने हैराण झालेल्या नागरिकांना दर्जेदार रस्त्याची अपेक्षा असताना, बांधकाम विभागाच्यावतीने रविवारी २४ मे रोजी डामरीकरणाचे काम करण्यात आले. या मार्गावर सोमवार सकाळ पासून वर्दळ सुरु झाली. मात्र काहीच वेळेत या मार्गावरील डांबर अक्षरशः हाताने उखडलया जात असल्याचे दिसून आले, यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे. कोद्री ते कुंदेगाव दरम्यान अंदाजे दोन किलोमीटरच्या पट्ट्यात हे काम करण्यात आले. हे काम इतक्या निकृष्ट दर्जाचे आहे की, रस्त्यावर टाकलेला डांबराचा थर हातानेही निघत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. जागोजागी गिट्टी बाहेर पडलेली असून अनेक ठिकाणी डांबर पूर्णपणे निघून रस्ता पुन्हा जुन्याच अवस्थेत जाण्याच्या मार्गावर आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, कंत्राटदाराने मन मर्जीने निकृष्ट दर्जाचे काम केले. रस्त्याची कोणतीही पूर्वतयारी, साफसफाई किंवा तांत्रिक प्रक्रिया न करता थेट धुळीने आणि मातीने भरलेल्या जुन्या रस्त्यावर डांबर टाकण्यात आले. नियमांनुसार आवश्यक असलेले प्रायमर, रोलर कॉम्पॅक्शन व दर्जा तपासणीची कोणतीही प्रक्रिया न पाळता केवळ दिखाव्यासाठी डामरीकरण केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
कोद्री ते कुंदेगाव या मार्गावरील रस्त्याच्या कामात सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार व कंत्राटदाराची मनमानी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

 

हा तर भ्रष्टाचाराचा जिवंत पुरावा
लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून डांबर टाकलं आणि दुसरे दिवशी सकाळीच ते उखडलं. एवढं निकृष्ट काम आम्ही आयुष्यात पाहिलं नाही. हा रस्ता नसून सार्वजनिक बांधकाम विभाग आणि कंत्राटदाराच्या भ्रष्ट संगनमताचा जिवंत पुरावा आहे. जनतेच्या कराच्या पैशांवर सरळ दरोडा टाकला जात आहे.”
– शिवचरण खोंड, मनसे तालुका प्रमुख

 

ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
रस्त्याचे काम तात्काळ दर्जेदार पद्धतीने पुन्हा करण्यात यावे, संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोद्री व कुंदेगाव येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

सकाळीच फाटला निकृष्ट कामाचा मुखवटा
२५ मे रोजी सकाळी दुचाकी आणि इतर वाहनांची ये-जा सुरू होताच नव्याने टाकलेले डांबर जागोजागी सुटू लागले. काही ठिकाणी मोठे तुकडे निघून गेले असून रस्त्यात पुन्हा खड्डे तयार होऊ लागले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसाठी हा मार्ग अधिक धोकादायक बनला आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, काम पूर्ण होण्याआधीच रस्ता उखडत असेल, तर या कामाच्या गुणवत्तेची कल्पना सहज येते. या प्रकारामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

कंत्राटदारास या बाबत सूचना देण्यात आल्या
वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंतर्गत कोद्री ते कुंदेगाव दरम्यान खराब झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरण डागडुगीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी करण्यात आलेला लिक्विड सीलकोट उखडल्याचे निदर्शनास आल्यानंतर संबंधित कंत्राटदारास ते काम तात्काळ दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच सदर मार्गावर पुढील टप्प्यात कार्पेट सीलकोटचे कामही करण्यात येणार आहे.
सागर लाड, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, जळगाव जामोद

 

ADMIN

आपल्या बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खालील क्रमांकावर संपर्क करावा ---------------------------- --------- 9822572589 .......... 9767932688 .......... politicslivenews@gmail.com ---------------------------- राजकीय बदलांना प्राधान्य देण्यात येईल -------

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!