लोणारात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
राहुल गांधींवरील कारवाईचाही निषेध; तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन

लोणार
नवी दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात शैक्षणिक व रोजगारासंदर्भातील मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावरील कारवाईच्या विरोधात लोणार शहर काँग्रेस कमिटी व लोणार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गुरुवारी (दि. 23) तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत तहसीलदारांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. तालुकाध्यक्ष अश्रुजी फुके, शहराध्यक्ष शेख समद शेख अहमद यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, ज्येष्ठ नेते साहेबराव पाटोळे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष आबेद खान, गटनेते नितीन शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले. निवेदनात म्हटले आहे की, जंतर-मंतर येथे विविध शैक्षणिक व रोजगारविषयक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेली कारवाई निषेधार्ह आहे. तसेच राहुल गांधी व त्यांच्या सहकाऱ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवून या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
यावेळी नगरसेवक पंढरी चाटे, सभापती अब्दुल उबेद हाजी अब्दुल मुनाफ, नियोजन सभापती साहेबराव पवार, नगरसेवक अरुण जावळे, गुलाब सरदार, शाम राऊत, जमील कुरेशी, रमजान परसुवाले, दौलत मानकर, शेख रऊफ, माजी नगरसेवक शंकर हेंद्रे, गोपी आखाडे, एजाज खान, सतीश राठोड, युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल सोनुने, अनिल पाटोळे, भवानी मापारी, प्रा. विठ्ठल भानुसे, शेख अफसर, आसाराम शिंदे, बहुजन आघाडीचे नेते प्रा. के. बी. इंगळे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष दिलीप राठोड, युवा आघाडीचे गौतम गवई यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन शिंदे यांनी केले, तर आभार प्रदर्शन शहराध्यक्ष शेख समद यांनी मानले.
महाराष्ट्र बंदला लोणार काँग्रेसचा पाठिंबा
लोणार तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटीने अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या 23 जुलैच्या महाराष्ट्र बंदला जाहीर पाठिंबा दिला. विद्यार्थ्यांवरील कथित लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि शैक्षणिक व रोजगारविषयक मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ हा पाठिंबा देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले.




