विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ लोणार बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
व्यापारी, हॉटेल व्यावसायिकांसह विविध घटकांचा सहभाग; काहींनी दिवसभर दुकाने ठेवली बंद

लोणार
दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने लोणार बंदचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला शहरातील व्यापारी, दुकानदार, हॉटेल व्यावसायिक तसेच विविध व्यावसायिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. काही व्यापाऱ्यांनी दिवसभर दुकाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला.
विद्यार्थ्यांवरील कथित मारहाणीच्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आणि त्यांच्या समर्थनार्थ शहरातील विविध भागात जनजागृती करण्यात आली. वंचित बहुजन आघाडी व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यापाऱ्यांना भेटून दिल्लीतील घटनेचा निषेध म्हणून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.
यावेळी शिवसेना शहरप्रमुख गजानन जाधव आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष गौतम गवई यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. तसेच तानाजी अंभोरे, श्रीकांत मदनकर, सुदाम अंभोरे, विजय घोडके, भारत राठोड, योगेश भक्कम, एकबाल कुरेशी, गौतम मोरे, इंगळे सर, गवळी सर यांच्यासह शिवसेना व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यापाऱ्यांनी दिला आंदोलनाला पाठिंबा
लोणार बंदच्या आवाहनाला शहरातील व्यापारी, हॉटेल चालक, भाजी विक्रेते तसेच लहान-मोठ्या व्यावसायिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सकाळी तीन तास दुकाने बंद ठेवून विद्यार्थ्यांवरील कथित कारवाईचा निषेध व्यक्त करण्यात आला, तर काही व्यापाऱ्यांनी दिवसभर व्यवहार बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दिला. व्यापाऱ्यांच्या या प्रतिसादामुळे बंदला शहरात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


